अरुणकुमार मेहत्रे , कळंबोलीपनवेल महानगरपालिका निवडणूक बुधवारी जाहीर होताच सायंकाळपासून महापालिका हद्दीत आचारसंहिताही लागू झाली आहे. तरीही शहरात, विशेषत: सिडको वसाहतीत अनेक ठिकाणी राजकीय बॅनर, होर्डिंग्ज झळकत आहेत. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असला तरी निवडणूकविभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार बॅनरबाजी, होर्डिंग्जबाजी सुरू आहे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली झाल्यानंतर या बॅनरबाजीला आणखीनच उधाण आहे. प्रमुख चौक, नाके, सिग्नल्स आदी ठिकाणी लहान-मोठे शेकडो बॅनर्स झळकत आहेत. मंगळवारी महापालिकेने कळंबोलीसह काही भागातील फलक, झेंडे काढले. परंतु तरीही अद्याप बऱ्याच ठिकाणी विनापरवाना राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर्स झळकत आहेत. आचारसंहिता असताना अशा प्रकारे बॅनर लावता येत नाही. मात्र घोषणा होऊन जवळपास २४ तास उलटले तरी शहरातील राजकीय बॅनर्स, होर्डिंग्ज, कमानी जैसे थे आहे. स्पॅगेटी पुलाजवळ काही दिवसांपूर्वी लावलेले पक्षप्रवेशाचे तर कळंबोलीत पुरुषार्थ पेट्रोल पंपालगत लावलेले ज्येष्ठ राजकीय नेत्याच्या स्वागताचे बॅनर्स तसेच आहेत. शहरात विविध ठिकाणी जयंती उत्सव, राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्सही मोठ्या प्रमाणात झळकत आहेत.सेनेची शक्तिप्रदर्शनाची संधी हुकलीच्तळोजा : पनवेलमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने गुरुवारी पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चातून शिवसेना शक्तिप्रदर्शन करून एकप्रकारे आपली ताकद दाखवणार होती. मात्र आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने गुरुवारचा नियोजित मोर्चा रद्द झाल्याने शक्तिप्रदर्शनाची सेनेची संधी हुकली आहे. महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यालयापासून निघणार होता.
आचारसंहिता लागूनही बॅनर्स जैसे थे
By admin | Published: April 21, 2017 12:21 AM