नेरळ : कर्जत -कल्याण राज्य मार्गावरील नेरळ-जिते गावालगत दरड कोसळून झाड पडले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर झाड आणि चिखल जमा झाल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
सतत दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जमीन दलदल होऊन नेरळ -जितें गावाजवळ दरड आणि झाड कोसळली आहेत. परिणामी दगड, माती रस्त्यावर आल्याने मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हा एक रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नेरळ जितें गावासमोर असलेल्या टेकडीवर अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असते. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना हे दिसत नसल्याने या भागात अशा घटना घडत आहेत. मागील वर्षीही याच ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळून दगड, माती रस्त्यावर आली होती. मात्र बाजूलाच टेकडी खोदल्याने त्याचा हादरा बसून या भागात दरड कोसळत आहेत. अनेक वेळा तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देखील हे उत्खनन थांबत नाही. अधिकाºयांचे साटेलोटे असल्याने पावसाळ्यात प्रवासी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी दरड कोसळून अनेक तास लोटले आहे, परंतु बांधकाम विभागाचे अधिकारी नॉटरीचेबल असल्याने नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक रातीलाल तडवी यांनी भेट दिली. बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने नेरळ पोलिसांच्या मदतीने जेसीबी लावून चिखल आणि झाड बाजूला करण्यात येणार असल्याचे पोलीस रातीलाल तडवी यांनी यावेळी सांगितले.