दुरुस्ती रखडल्याने कोसळला पादचारी पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:52 PM2019-04-12T23:52:40+5:302019-04-12T23:52:53+5:30
पंपहाउसही धोकादायक : पुलाचा वापर बंद करण्याकडेही झाले दुर्लक्ष
नवी मुंबई : वाशी सेक्टर ८ मधील पादचारी पूल वेळेत दुरुस्त करण्यात आला नाही. धोकादायक पुलाचा वापरही पालिकेने न थांबविल्यामुळे अपघात झाला आहे. येथील पंपहाउसची इमारतही धोकादायक झाली आहे. पंपहाउसकडे येणारे पाइप ठेवण्यासाठी उभारलेल्या पिलरलाही तडे गेले आहेत.
सागर विहार व मिनी सीशोर परिसराला रोज हजारो नागरिक भेट देत असतात. दोन्ही ठिकाणी ये-जा करता यावे, यासाठी महापालिकेने होल्डिंग पॉण्डवर पादचारी पुलाची निर्मिती केली. ४ मे २००० मध्ये हा पूल वाहतुकीला खुला करण्यात आला. खाडीकिनारी असल्यामुळे पुलाचा लोखंडी सांगाडा गंजला आहे. हातानेही लोखंडाचा भाग निघू लागला होता. स्थानिक नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी पालिकेकडे यासाठी पाठपुरावाही केला होता. दक्ष नागरिकांनीही ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती; परंतु महापालिकेने वेळेत दुरुस्तीचे काम केले नाही. सद्यस्थितीमध्ये दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु पुलाचे बांधकाम धोकादायक असूनही त्याचा वापर सुरूच होता. महापालिका प्रशासनाने पुलाचा वापर बंद करणे आवश्यक होते; पण यासाठी योग्य खबरदारी न घेतल्यामुळे गुरुवारी पूल कोसळला व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याच ठिकाणी महापालिकेचे पंपहाउस आहे. पावसाळ्यात व भरतीच्या वेळी होल्डिंग पॉण्डमधील पाणी वाढल्यास ते पुन्हा खाडीत सोडण्यासाठी पंपहाउस बांधले आहे. पाणी खाडीत सोडण्यासाठी सहा पाइप बसविले आहेत. या पाइपसाठी १८ लोखंडी पिलर तयार केले आहेत. या पिलरलाही तडे गेले आहेत. पिलरमधील लोखंड दिसू लागले आहे.
पंपहाउसची इमारतही धोकादायक झाली असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. छताचीही अवस्था बिकट आहे. जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पंपहाउस व पादचारी पूलाची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करत आहेत; परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे पूल कोसळला असून, पंपहाउसही कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, अशी स्थिती आहे.
पंपहाउसच्या
पिलरला तडे
वाशीमधील पंपहाउसमधून सहा पाइप खाडीमध्ये सोडण्यात आले आहेत. या पाइपसाठी एकूण १८ सिमेंटचे पिलर उभारले आहेत. या सर्व पिलरला तडे गेले आहेत. कोणत्याही क्षणी पिलर व पाइप कोसळण्याची शक्यता असून ते वेळेत बदलणे आवश्यक आहे.
निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
वाशीमधील पादचारी पूल कोसळल्या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून व जखमींचा जबाब घेऊन निष्काळजीमुळे हा अपघात झाला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास करून या निष्काळजीला नक्की जबाबदार कोण हे निश्चित केले जाणार आहे.
दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय यापूर्वीच घेतला असून लवकरच ते काम सुरू केले जाणार होते. पंपहाउसचेही संरक्षणात्मक लेखा परीक्षण करण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.