‘त्या’ गुन्ह्यांचा एकत्रित तपास करा - पोलीस महासंचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 06:32 AM2018-09-26T06:32:56+5:302018-09-26T06:33:05+5:30
दोन वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या १७ हून अधिक घटना घडल्या आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - दोन वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या १७ हून अधिक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये एकाच संशयित आरोपीचा समावेश पोलिसांच्या तपासात समोर आला आहे; परंतु अद्यापही त्याचा शोध लागत नसल्याने घटना घडलेल्या आयुक्तालयातील पोलिसांनी एकत्रित तपास करण्याचे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांंनी दिले आहेत.
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच पालघर परिसरात घडत आहेत. साधारण १४ व त्याखालील वयाच्या मुलींना फसवून एकांतात नेऊन त्यांना वासनेचे बळी दिले जात आहे. त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये घटनास्थळावरील सीसीटीव्हीत एकाच संशयित आरोपीचा समावेश आढळून आलेला आहे, यानुसार त्याच्या शोधासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कसून तपास करत आहेत. त्याची सीसीटीव्हीद्वारे प्राप्त छायचित्रे पोलिसांनी सर्वत्र प्रसिद्ध केली आहेत. ज्या ठिकाणी गुन्हे घडले आहेत, तिथल्या पोलिसांकडून स्वतंत्रपणे तपास सुरू आहे. शिवाय, गुन्हे शाखेकडूनही सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
यानंतरही आरोपीविषयीचा कसलाही ठोस पुरावा कोणत्याच पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे सर्व पोलिसांनी एकत्रितरीत्या तपास करून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करूनही मोकाट असलेल्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत.