योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नैसर्गिक आपत्तीतून शहराच्या संरक्षणासाठी मॅन्ग्रोव्ह महत्वाचे असून एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनच्या मॅन्ग्रोव्ह सोल्जर्स तर्फे नवी मुंबईतील करावे जेट्टी जवळ १८९ वी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे १ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत विविध क्षेत्रातील सुमारे ६० नागरिकांनी सहभाग घेतला होता.
खाडीकिनारी वसलेल्या मुंबई उपनगराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होण्यासाठी कांदळवन महत्वाचे असून कांदळवन परिसरात झालेल्या अस्वच्छतेमुळे कांदळवनाची सुरक्षा धोक्यात आली आहे. पर्यावरण प्रेमी धर्मेश बराई यांनी १५ ऑगस्ट २०२० पासून कांदळवन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. बराई यांच्या कार्याचे महत्व लक्षात घेऊन आजवर १८९ आठवड्याच्या स्वच्छता मोहिमेत सुमारे ५० हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
कांदळवन परिसरातील आजवरच्या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, वैद्यकीय आणी कॉस्मेटिक कचरा, थर्माकोल, स्कूल बॅग, चपल, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या सुमारे ५०० टन हुन अधिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. १८९ व्या स्वच्छता मोहिमेत क्रिकेट अंपायर असोसिएशनचे सचिव नावीद इब्राहिम आणि त्यांचे सहकारी तसेच इनरव्हील नवी मुंबई संगिनी सेंच्युरियनचे अध्यक्ष अजितकौर ढीलॉन आणि त्यांचे सहकारी अशा तब्बल ६० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.