नवी मुंबई : सिडकोच्या वसाहत विभागातील विविध सेवा शुल्क भरण्यासाठी आता आॅनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वसाहत विभागांच्या हस्तांतरण, तारण ना हरकत प्रमाणपत्र, मुदतवाढ, अतिरिक्त चटईक्षेत्र, तसेच तात्पुरत्या परवानग्या आदीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करण्यात आली होती. आता त्यासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठीही आॅनलाइन सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. २ जुलैपासून या सुविधा सुरू होत आहेत.सिडकोतील वसाहत विभाग हा महत्त्वाचा आहे. या विभागात विविध कामांसाठी दिवसभरात शेकडो लोक येतात. विविध कारणामुळे त्यांच्या कामाला विलंब होतो, त्यामुळे नाहक वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो, तसेच या प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत होता. चिरीमिरीची सवय लागल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू होता. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेत सिडकोने पहिल्या टप्प्यात विविध सेवाअर्ज आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली; परंतु त्यानंतर शुल्क भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट देणे बंधनकारक होते. डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी अर्जदाराचा बँकेत व त्यानंतर सदर डिमांड ड्राफ्ट भरण्यासाठी सिडको कार्यालयात यावे लागत होते. यात संबंधित अर्जदाराच्या वेळेचा अपव्यय होत होता. या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आता शुल्क भरण्यासाठी कोपास अर्थात आॅनलाइन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून ही सेवा प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. सिडकोच्या नागरी सुविधा केंद्रावर आॅनलाइन अथवा आॅफलाइन अर्ज करणाºया नागरिकांना आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे आॅनलाइन शुल्क अदा करता येणार आहे.दरम्यान, नागरिकांच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची आहे. अर्ज, आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि शुल्क भरणे, ही कामे आता आॅनलाइन होणार असल्याने त्यासाठी नागरिकांना आता शुल्क भरण्यासाठी सिडकोच्या फेºया माराव्या लागणार नाही, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.
वसाहत विभागातील सेवा शुल्क आता आॅनलाइन; २ जुलैपासून सुविधेचा प्रत्यक्ष शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:17 AM