नवी मुंबईत लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 12:46 AM2021-01-09T00:46:21+5:302021-01-09T00:46:27+5:30
कोविन ॲपची केली चाचणी : भविष्यात ५० केंद्रांचे नियोजन, प्रतिदिन १०० जणांना लस देण्यात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोना लसीकरणासाठीची रंगीत तालीम शुक्रवारी नवी मुंबईत यशस्वीपणे पार पडली. लसीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे कोविन ॲप व्यवस्थित चालत असल्याचे निदर्शनास आले. आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष प्रक्रियेची पाहणी करून ओळखपत्राची काटेकोर चाचणीबरोबरच हेल्पलाइनविषयी आवश्यक सूचना केल्या.
नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रुग्णालयात प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. केंद्रावर ४ व्हॅक्सिनेशन ऑफिसर व १ व्हॅक्सिनेटर ऑफिसरची नियुक्ती केली होती. लसीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी कोविन ॲप तयार केले आहे. या ॲपवर लसीकरणाची नोंदणी केल्यानंतर, संबंधित व्यक्तीला लसीकरणाचा दिवस, स्थळ व वेळ याविषयी माहिती मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रमाणपत्रही मोबाइलवरच देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲप व्यवस्थित चालते की नाही, याची चाचणी करण्यात आली. नवी मुंबईमध्ये ही चाचणी यशस्वी झाली आहे. प्रत्यक्ष चाचणीच्या वेळी व्हॅक्सिनेशन अधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी शासनाने दिलेल्या ओळखपत्राची बारकाईने पडताळणी करावी, असे सूचित केले. प्रतीक्षा कक्षात सुरक्षित अंतर ठेवून बैठक व्यवस्था करावी. आवश्यकतेनुसार प्रतीक्षा कक्षांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. संदेश फलकावर हेल्पलाइन नंबर देण्यात यावा व लसीकरण झाल्यानंतर सूचनांचे हस्तपत्रकही देण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये ५० लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक केंद्रांवर प्रतिदिन १०० जणांना लस देण्यात येणार आहे. भविष्यात आवश्यकतेप्रमाणे केंद्रांमध्ये वाढ केली जाणार आहे. शहरात पहिल्या टप्प्यात १७ हजारांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात पोलिसांसह स्वच्छता कर्मी
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, स्वच्छता कर्मचारी, कोरोना काळात कार्यरत असणारे इतर कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. त्यापुढील टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक, सहव्याधी असणारे नागरिक यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीकरणासाठीची रंगीत तालीम घेतली आहे. लसीकरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी केली असून, लसीकरणासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे.
- अभिजीत बांगर,
आयुक्त, महानगरपालिका