पनेवल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेले दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी नागरिकांचा उत्साह व्दिगुणीत होताना दिसला. महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात संध्याकाळी शेकडो घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पालिकेने गणोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. गणेशभक्तांच्या सोयी सुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग या ७ विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून विसर्जन घाटांवरती संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.महापालिका क्षेत्रात एकुण 61 ठिकाणी भक्तांना गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. यामध्ये खारघर मध्ये 37 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खारघर प्रभागामध्ये 47 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कळंबोली प्रभागामध्ये 9 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येथे 66 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कामोठे प्रभागामध्ये 6 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 26 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. पनवेल प्रभागामध्ये 9 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 61 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. चारही प्रभागांमध्ये कृत्रिम तलाव ,विद्युत व्यवस्था, मंडप, बॅरिगेटिंग, गणेश मूर्तीची नोंदणी, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, तराफा निर्माल्य कलशाची सोय करण्यात आली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर महापालिकेच्यावतीने अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभाग तसेच पोलिस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता. विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने नागरिकांसाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग प्रणाली विकसित करून दिली आहे.
पुढच्या वर्षी लवकर या... भावपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन
By वैभव गायकर | Published: September 01, 2022 6:41 PM