पनवेल : सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूरकरांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. खारघर येथील जी. डी. पोळ कॉलेजमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या नवी मुंबई, पनवेल येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख यांनी सोलापूरच्या विकासासाठी काय काय करायला पाहिजे याची माहिती उपस्थितांना दिली. २५ वर्षांपूर्वी सोलापूर हे राज्यात चौथ्या क्र मांकाचे शहर होते. पंढरपूर येथील देशपातळीवरील सर्वात मोठे देवस्थान हे सोलापुरात आहे. तसेच सोलापुरातील ज्वारी, शेंगदाणा चटणी, चादर, साखर कारखाने, डाळिंब महाराष्ट्रासह जगभरात प्रसिद्ध आहेत. या सर्वांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांचाच हातभार लागणे आवश्यक असून त्यासाठी संघटित होवून काम करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. सोलापूर सोशल फाउंडेशनचे कोअर कमिटी सदस्य धनराज गरड यांच्या पुढाकाराने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी उपस्थित होते.विशेषत: आयपीएस अशोक दुधे, आयपीएस विश्वास पांढरे, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दाजी भाकरे, जी. डी. पोळ फाउंडेशनचे अध्यक्ष जी. डी. पोळ, सतीश बागल, सुनील चव्हाण, लीना अर्जुन गरड, आरती नवघरे उपस्थित होते.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:48 AM