कमांडर्स गेटवेच्या बिल्डरला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:52 AM2018-03-21T00:52:58+5:302018-03-21T00:52:58+5:30
घर, बंगलो विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कमांडर्स गेटवे प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने २०० हून अधिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. गृहप्रकल्पासाठी पैसे घेवूनही वेळेत प्रकल्प सुरू न करता ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई : घर, बंगलो विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कमांडर्स गेटवे प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने २०० हून अधिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. गृहप्रकल्पासाठी पैसे घेवूनही वेळेत प्रकल्प सुरू न करता ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
शैलेश दावडा असे पोलिसांनी अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने वालजी गोकुलदास अँड सन्सच्या वतीने पनवेलमधील विहीघर येथे गृहप्रकल्प सुरू असल्याची जाहिरातबाजी केली होती. त्यामध्ये फ्लॅट, बंगलो याशिवाय रोहाऊस खरेदीसाठी ग्राहकांना लक्ष्य केले होते. याकरिता इच्छुक ग्राहकांना कमांडर्स गेटवे नावाने प्रकल्प दाखवून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार अनेकांनी घर, बंगला खरेदीसाठी कमांडर्स गेटवेमध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदारांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश आहे. परंतु २०१४ मध्ये पैसे भरून देखील अद्याप प्रस्तावित जागेवर कसलेही काम सुरू केलेले नव्हते.
याप्रकरणी ग्राहकांनी संपर्क साधल्यास त्यांना ठोस उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच नौदलाचे कमांडर मनीष जोशी यांच्या तक्रारीवरून डिसेंबर २०१७ मध्ये खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासासाठी हा गुन्हा गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त राजकुमार चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा दोनकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजू सोनवणे, सहायक निरीक्षक कृष्णा मेखले हे अधिक तपास करत होते.
तपासाअंती त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री शैलेश दावडा याला अटक करण्यात आली आहे. दावडा याने २०० हून अधिक ग्राहकांकडून पैसे घेवून तीन कोटीपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.