नोडल अधिकाऱ्यांकडून शहरात स्वच्छ सर्वेक्षणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:32 AM2021-02-10T00:32:50+5:302021-02-10T00:33:12+5:30
प्रत्येक विभागाचा मूल्यांकन अहवाल तयार होणार
नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले आहे. स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय अधिकारी नियुक्त केले आहेत. अधिकाऱ्यांकडून ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान सर्वेक्षण करण्यात होणार असून प्रत्येक विभागाचा मूल्यांकन अहवाल तयार केला जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रीय पथकामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाण्यापूर्वी सर्वेक्षणाच्या माहिती पुस्तिकेस अनुसरून स्वच्छतेच्या निकषांची तपासणी नोडल अधिकाऱ्यांकडून करून घेण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारपासून विभागीय नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रभागनिहाय पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महत्त्वकचे म्हणजे प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांचे यापूर्वीचे विभाग हे स्वच्छ सर्वेक्षण करण्याकरिता बदलण्यात आले आहेत, जेणेकरून अधिक बारकाईने परीक्षण होईल. ९ तारखेपासून १३ फेब्रुवारीपर्यंत विभागीय नोडल अधिकाऱ्यांमार्फत हे परीक्षण केले जाणार असून त्यांनी परीक्षणासाठी नेमून दिलेल्या विभागांतर्गत असलेल्या प्रभागातील स्वच्छता कामांची तपासणी सूचीनुसार (चेक लिस्ट) पाहणी करावयाची आहे. मूल्यांकन अहवाल तयार करून महापालिका आयुक्तांना सादर करायाचा आहे. त्याचप्रमाणे तपासणीदरम्यान नोडल अधिकाऱ्यांना आढळून येणाऱ्या त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची १३ फेब्रुवारीपूर्वी पूर्तता करून घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी नोडल अधिकाऱ्यांनी मूल्यांकन केलेल्या प्रभागातील कामांची नमुना दाखल फेरतपासणी करावी, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.