खोपट्यातील ८१ वर्षाची परंपरा जपणारा शिव-गौरा उत्सवाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:42 PM2022-09-05T19:42:22+5:302022-09-05T19:43:52+5:30
मागील ८१ वर्षांची सलग पाच दिवस उत्सव साजरा करण्याची परंपरा जपणाऱ्या शिवकृपा मंडळाच्या शिवगौराई उत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे.
मधुकर ठाकूर
उरण : मागील ८१ वर्षांची सलग पाच दिवस उत्सव साजरा करण्याची परंपरा जपणाऱ्या शिवकृपा मंडळाच्या शिवगौराई उत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. उरण तालुक्यातील खोपटा येथील शिवगौराई उत्सवाच्या पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भजन,किर्तन, गोंधळ, महिला पुरूषांचे पारंपारिक नृत्य, मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.
उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील रामजी पाटील,रघुनाथ पाटील, विश्वनाथ पाटील, जनार्दन पाटील, रामभाऊ भगत, दादु पाटील, जगन्नाथ पाटील आदी गावकऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने १९४१ साली शिवकृपा गौरा मंडळाची स्थापना केली. पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौऱ्याची स्थापना केली जात होती. कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले. त्यानंतर त्याच ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून या मंदिरात शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.
गौरी आवाहनाच्या दिवशी सूरू होणाऱ्या या गौरा उत्सवात शंकर,पार्वती आणि गणेशाची एकत्रीत मुर्ती बसविण्यात येते. पहिल्या दिवशी महिलांना येथे प्रवेश दिला जात नाही. यावेळी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कथा प्रसंगावर सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जातात. विशेष म्हणजे दरवर्षी बसविण्यात येणाऱ्या या मुर्ती शाडू मातीच्याच बनविण्यात येतात. पाच दिवस चालणाऱ्या या गौरा उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन,
किर्तन, गोंधळ, महिला-पुरूषांचे पारंपारिक नाचांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
या मंडळाचे आणि गौरा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ८१ वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधून पारंपारिक बाले नाच, शक्ती तुऱ्याचे नाचाची जूगलबंदीचे सामन्यांशिवाय या उत्सवाची सांगता होत नाही. नवसाला पावणारा अशी या शिवगौऱ्याची ख्याती आहे.मागील ८१ वर्षापासून हा सण अखंडपणे साजरा करण्यात येतो. भाद्रपद शुद्ध द्वादशीला ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून सुर्यास्तापूर्वी या शिवगौऱ्याचे विसर्जन केले जाते.या शिवगौराच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण अलिबाग परिसरातील हजारो भाविक येतात.