नवी मुंबई : विविध प्रयोजनासाठी आरक्षित केलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यातील अनेक भूखंडांचा सर्रासपणे व्यावसायिक वापर होताना दिसत आहे. या भूखंडांवर बेकायदा टेम्पो व रिक्षांचे वाहनतळ, खाद्यपदार्थ आणि पानाचे ठेले तसेच बांधकाम साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या प्रकाराकडे सिडकोच्या संबंधित विभागाने ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केल्याने या अतिक्रमणाचा ताप परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
सिडकोने शहराच्या विविध विभागात सामाजिक प्रयोजनासाठी मोठ्या प्रमाणात भूखंड आरक्षित केले आहेत; परंतु नियोजित वेळेत या भूखंडांचा वापर केला गेला नाही. त्यामुळे यातील अनेक भूखंडांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. तर काही भूखंडांवर अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत. काही स्थानिक पुढाऱ्यांनी आपल्या परिसरातील मोकळे भूखंड विविध व्यावसायिकांना भाडेपट्ट्यावर दिले आहेत. ऐरोली, घणसोली, वाशी, कोपरखैरणे, नेरुळ आदी नोडमध्ये सिडकोच्या मोकळ्या भूखंडांचा मोठ्या प्रमाणात अशाप्रकारे व्यावसायिक वापर होत असल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरीच्या काळात सिडकोच्या संबंधित विभागाने अशा प्रकारच्या आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे हटवून त्याला तारेचे कुंपण घातले आहे, तसेच या ठिकाणी सिडकोने फलकही लावले आहेत.सिडकोविषयी नागरिकांची नाराजीकोपरखैरणे सेक्टर ३ ए येथील नॉर्थ पॉइंट शाळेच्या समोरील बाजूस सिडकोचा मोठा भूखंड आहे. या भूखंडावर बांधकाम साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी विटा, रेती व खडीचे ढीग रचून ठेवले आहेत. तसेच याच भूखंडावर बेकायदा पार्किंग होत आहे.विशेष म्हणजे, भूखंडावर सिडकोचा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरसुद्धा अतिक्रमण करण्यात आले आहे. या प्रकाराला सिडकोच्या संबंधित विभागाचा गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे.