नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे ६० टक्के काम झाले असून ३१ मार्च २०२५ पासून या विमानतळाचा पहिला टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाची पाहणी केली. त्यानंतर सिडकोसह संबंधित यंत्रणेसोबत बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
विमानतळाची वैशिष्ट्ये नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज आहे.