योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महानगरपालिकेच्या बांधून तयार झालेल्या वास्तू विहित प्रयोजनासाठी वापरात याव्यात असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील मार्केटच्या इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मार्केट इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करुन त्या वापरात येण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. सूचना केलेल्या बाबींची तातडीने अंमलबजावणी करुन ही मार्केट तत्परतेने सुरु करावीत असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
दिवाळेगाव येथील मार्केटची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील अंतर्गत व परिसर स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या. त्या ठिकाणी सदयस्थितीत पोर्टेबल स्वरुपाची शौचालये ठेवलेली असून तेथे कायमस्वरुपी शौचालय बांधावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. सानपाडा सेक्टर ४ येथील दैनंदिन बाजार इमारतीची पाहणी करताना विक्रेत्यांना व ग्राहकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने तेथील ओटल्यांची रचना काहीशी बदलून ती टेबल स्वरुपाची करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. हे काम तत्परतेने करुन मार्केट त्वरित वापरात आणण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सानपाडा सेक्टर १४ येथील मार्केटमध्येही बाहेरच्या बाजूस वेदरशेड करण्याच्या सूचना करुन त्याठिकाणी असलेल्या दुसऱ्या प्रवेशव्दारावरुन नागरिकांना सुलभतेने ये-जा करण्यासाठी तेथे पायऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. वाशी सेक्टर १ येथील मार्केटमधील ओटल्यांची रचना बदलण्याचे सूचित करुन आयुक्तांनी त्याठिकाणचेही छत बाहेरच्या बाजूस वाढवून वेदरशेड टाकण्याच्या सूचना केली. वाशी सेक्टर ९ येथील एनएमएमटी बस टर्मिनस व वाणिज्य संकुल बांधकामाचीही पाहणी करत विविध सूचना केल्या. या दौऱ्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी नवी मुंबई क्षेत्रातील पावसाळी स्थितीचीही पाहणी केली. यावेळी शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच उपआयुक्त सोमनाथ पोटरे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.