नवी मुंबई : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संबंधित विभागाला दिले.महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते. २0१६-१७ या आर्थिक वर्षात ६३७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. गेल्या वर्षीप्रमाणेच चालू वर्षीही मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे. २0१७-१८ या आर्थिक वर्षात २0 फेब्रुवारीपर्यंत ४३२ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. पुढील काळात गतवर्षीप्रमाणे वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नियमानुसार धडक कारवाई मोहीम हाती घेण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. आजही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर थकला आहे.बड्या थकबाकीदारांना कायदेशीर नोटिसा बजावून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणणे, नळजोडणी खंडित करणे आदी स्वरूपाच्या कारवाया करण्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे. त्यामुळे येत्या काळात मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेच्या माध्यमातून धडक मोहीम राबविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका आक्रमक, आयुक्तांचे आदेश : धडक कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 2:19 AM