दोषमुक्तीचा अहवाल आयुक्तांनी नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:44 AM2017-12-28T02:44:30+5:302017-12-28T02:44:32+5:30

नवी मुंबई : मालमत्ता कर विभागाचे निलंबित कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांच्यावरील आरोप सिद्ध होत नसल्याचे निष्कर्ष चौकशी अधिका-यांनी काढले होते;

The Commissioner of Repudiation was rejected by the Commissioner | दोषमुक्तीचा अहवाल आयुक्तांनी नाकारला

दोषमुक्तीचा अहवाल आयुक्तांनी नाकारला

Next

नवी मुंबई : मालमत्ता कर विभागाचे निलंबित कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांच्यावरील आरोप सिद्ध होत नसल्याचे निष्कर्ष चौकशी अधिका-यांनी काढले होते; परंतु आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा अहवाल नाकारला आहे. मूळ दोषारोप व त्या संदर्भातील दोषारोप सिद्ध होत असल्याचे तात्पुरते निष्कर्ष काढले असून कुलकर्णी यांना त्यांचे म्हणने सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागात घोटाळा झाल्याचा निष्कर्ष २०१६मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढला होता. या प्रकरणी २५ मे २०१६ रोजी तत्कालीन कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांना निलंबित केले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय जून २०१६ मध्ये त्यांची चौकशी करण्यासाठी बी. सी. हांगे यांची नियुक्ती केली होती. कुलकर्णी यांच्यावर चार प्रमुख आरोप ठेवण्यात आले होेते. यामध्ये मालमत्ता कर विभागात अनेक मालमत्तांना एकाच कालावधीसाठी दोन वेगवेगळ्या रकमांची मालमत्ता कर देयके बजाविणे. काही कालावधीनंतर कमी रकमांची देयके अभिलेखात ठेवणे. जास्त रकमेची मालमत्ता कर देयके संंगणक प्रणालीतून वगळणे. अनेक प्रकरणी टीडब्ल्यूआर मालमत्तांचे करपात्र मूल्य निश्चीत करून कर निर्धारण न करता नवीन टीडब्ल्यूआर तयार करून मनपाचे नुकसान केले. एलयूसी (लँड अंडर कंस्ट्रक्शन) अशाप्रकारच्या मालमत्तांचे कर संकलन न करणे. अनेक प्रकरणी ना देय प्रमाणपत्र दिलेल्या मालमत्तांचे पुढील कर देयकांमध्ये मागील थकबाकी दर्शविणे. मालमत्तांचे कर थकीत असतानाही त्या मालमत्तांना ना देय प्रमाणपत्र देणे. देय मालमत्ता कर वसूल करणे असतानाही अनामत रक्कम स्वीकारून मूळ देय असलेला मालमत्ता कर वेळेत वसूल केला नाही.
चौकशी अधिकारी बी. सी. हंगे यांनी या प्रकरणाची चौकशाी करून जून २०१७मध्ये अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. महापालिकेने केलेले चारही दोषारोप सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. महापालिकेले केलेल्या आरोपांविषयी काहीही पुरावे देता आलेल नसल्याचेही स्पष्ट केले होते. या प्रकरणी आयुक्त रामास्वामी एन. यांनी अखेर ठोस भूमिका घेतली आहे. शिस्तभंगविषयी प्राधिकारी यांनी चारही दोषारोपासंदर्भातील चौकशी अधिकारी यांचे निष्कर्षास असहमती दर्शविली आहे. सदर प्रकरणी ठेवण्यात आलेले मूळ दोषारोप व त्यासंदर्भात कागदपत्रे यावरून सदर दोषारोप सिद्ध होत असलेबाबत तात्पुरते निष्कर्ष काढलेले आहेत. चौकशी अहवालावरील असहमतीच्या कारणांसह चौकशी अहवालाची प्रत अपचारी कुलकर्णी यांना कळवून त्यावर १५ दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
मालमत्ता कर विभागाच्या घोटाळ्याचा घटनाक्रम
२ मे २०१६ रोजी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मालमत्ता कर विभागाची झाडाझडती घेतली होती.
२५ मे २०१६ रोजी कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई
जून २०१६ - कुलकर्णी यांची चौकशी करण्यासाठी बी. सी. हंगे यांची नियुक्ती
जून २०१७ - हंगे यांनी दोष सिद्ध होत नसल्याचा अहवाल सादर केला
डिसेंबर २०१७ - आयुक्तांनी चौकशी अहवालास असहमती दर्शवून कुलकर्णींना म्हणने मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली

Web Title: The Commissioner of Repudiation was rejected by the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.