पनवेल : पनवेलमध्ये ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता 31 डिसेंबर रोजी रात्री उशिरा पालिका आयुक्त गणेश देशमुख स्वतः आपल्या पथकासह रस्त्यावर उतरले. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तसेच नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. प्रशासनाने 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनला मनाई केली आहे. मात्र, काही ठिकाणी जल्लोषात सेलिब्रेशन सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, पालिका आयुक्त रस्त्यावर उतरले होते.
प्रशासनाने 31 डिसेंबरच्या सेलेब्रेशनवर बंदी घातली आहे. हॉटेल्स, बार आदी नाईट कर्फ्यूमुळे बंद ठेवण्यात आले होते. तरी देखील काही आस्थापना सुरू आहेत का? याबाबत खात्री करण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख स्वतः रस्त्यावर उतरले. यावेळी उपायुक्त सचिन पवार,विठ्ठल डाके आदींसह सहाय्यक आयुक्त व प्रभाग अधिकारी उपस्थित होते. पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे बहुतांशी ठिकाणी रस्ते ओस पडले होते. नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या आवाहनास यावेळी प्रतिसाद दिला.