रेल्वेचे आरक्षण करणारे दलाल अटकेत, अतिरिक्त रकमेची होत होती आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:51 AM2017-10-23T02:51:27+5:302017-10-23T02:51:30+5:30
रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करणा-या दोघा दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही सिडकोचे सुरक्षारक्षक असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
नवी मुंबई : रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करणा-या दोघा दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही सिडकोचे सुरक्षारक्षक असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली आहे. तिकिटाच्या रकमेपेक्षा ४०० ते ५०० रुपये जादा घेऊन ते प्रवाशांना आरक्षण करून द्यायचे.
कोपरखैरणे रेल्वेस्थानकात नेमलेल्या सिडकोचे इलेक्ट्रिशन कामगार रेल्वे तिकिटांच्या आरक्षणात दलाली करत होते. याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक लोकेश सागर यांना मिळाली होती. यानुसार आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक डी. के. शर्मा, हवालदार किसन सिंह, महेश गुर्जर, नीलेश दळवी यांच्या पथकाने बुधवारी दुपारी कोपरखैरणे स्थानकात तिकीटखिडकी परिसरात सापळा रचला होता. या वेळी अमीर लाल भगत उर्फ दुर्गा व सुरेश पवार यांना रेल्वेतिकिटांची दलाली करताना रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत दोघेही सिडकोच्या विद्युत विभागातील कर्मचारी असल्याचे समोर आले. भगत हा कोपरखैरणे स्थानकात, तर पवार हा सीवूड स्थानकात नेमलेला आहे. यापूर्वी दोघेही कोपरखैरणे स्थानकात एकत्र कार्यरत होते. यादरम्यान त्यांचे कार्यालय व रेल्वेतिकिटांची आरक्षण खिडकी शेजारीच असल्याची संधी साधून त्यांनी दलाली सुरूकेली होती. याकरिता उत्तरप्रदेशमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना गाठून त्यांचे आरक्षण करून देतो, असे सांगायचे. याकरिता त्यांच्याकडून ४०० ते ५०० रुपये जादा रक्कम घ्यायचे. व्यवहार निश्चित झाल्यानंतर इतर प्रवाशांनी लावलेली रांग तोडून ते थेट खिडकीजवळ जाऊन तिकीट काढून त्यांना द्यायचे. मात्र, त्यांच्याकडून सुरू असलेल्या या प्रकाराचा त्रास इतर प्रवाशांना व्हायचा. यामुळे तक्रार प्राप्त होताच कोपरखैरणे स्थानकात सापळा रचून दोघांनाही अटक केल्याचे आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक लोकेश सागर यांनी सांगितले.