नवी मुंबई - सातारा - जावळीमधून नोकरी - व्यवसायानिमित्त मुंबई, नवी मुंबईमध्ये आलेल्या नागरिकांना विविध प्रश्न भेडसावत असतात. सातारावासीयांचे घरांपासून इतर प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून, प्रत्येक प्रसंगामध्ये ठामपणे सोबत राहण्याचे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहे.श्रीमंत छत्रपती बाबाराजे युवा प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने कोपरखैरणेमधील अण्णासाहेब पाटील मैदानामध्ये सातारा व जावळीमधील रहिवाशांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, राजकारण बाजूला ठेवून सातारा व जावळी मतदार संघाचा व येथील नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. आयुष्याच्या प्रवासामध्ये मित्र जोडण्यास व टिकविण्यास प्राधान्य दिले आहे. जोडलेला एकही मित्र पुन्हा गमावला नाही. शांतपणे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यास प्राधान्य देत आहे. परंतु शांत आहे म्हणजे काहीही सोसणार नाही. एखादी गोष्ट सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर कसा तुकडा पाडायचा हे मलाही चांगलेच माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माजी खासदार संजीव नाईक यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले. सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंत मानकुमरे यांनीही गावच्या विकासामध्ये मुंबईकरांचे योगदान महत्त्वाचे असते. निवडणुकीमध्ये मुंबईतील एक व्यक्ती गावी आला तरी मतदानाचे स्वरूप बदलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मतदार संघात सुरू असलेल्या विकासकामांची त्यांनी माहिती देवून वेळ पडलीच तर लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले.यावेळी आयोजित स्पर्धेतील विजेत्या महिलांना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पैठणी भेट दिली. कार्यक्रमास राजू भोसले, नगरसेवक शंकर मोरे, एस.डी.सी. बँकेचे अध्यक्ष मधुकर मोरे, श्रीमंत छत्रपती बाबाराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तानाजी दळवी,दत्ता गावडे, ज्ञानदेव रांजणे, विजय सुतार, राजू ओंबळे, शैलेश जाधव, रॉबीन मढवी, संदीप म्हात्रे, शिवाजीराव घोरपडे, अमृतलाल शेडगे, नामदेव चिकणे, विजय सावले व इतर मान्यवर उपस्थित होते.मुंबईमध्येही मेळावाबाबाराजे मित्र मंडळाच्यावतीने राष्ट्रीय मिल मजदूर संघ परेल येथेही सातारावासीयांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळीमधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाई वांगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, बाजार समिती सभापती विक्रम पवार, प्रल्हाद साळुंखे, महेंद्र देवरे, श्रीरंग केरेकर, शंकर देवरे, रवी काटकर, अजित जाधव, रवी काटकर,सुनील जाधव, अंकुश मोरे, दिलीप यादव, धनाजी शेडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विकासरत्न अभयसिंहराजे भोसले महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल युनियनच्यावतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सिंहाची प्रतिमा भेट देण्यात आली.
सातारा-जावळीवासीयांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध, शिवेंद्रसिंहराजेंचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:53 AM