नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी सिडकोने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात महा मेट्रोची नियुक्ती केली आहे. महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी सिडको अधिकाऱ्यांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी महामेट्रोने वीस तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश असलेली समिती गठित केली आहे.
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने नवी मुंबई मेट्रोचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत मेट्रोचे एकूण चार उन्नत मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी बेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके असून तळोजा येथे मेट्रोसाठी आगारही तयार करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्याच्या मेट्रोची अलीकडेच यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. असे असले तरी या मार्गावरील ११ पैकी १ ते ६ स्थानकांचे काम काही तांत्रिक कारणामुळे रखडले आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे या कामाला अपेक्षित गती देता आलेली नाही. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे या उद्देशाने महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार आहे. तर प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महामेट्रो काम पाहणार आहे.
त्यानुसार कामाला गती देण्यासाठी महामेट्रोने तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली आहे. या समितीसाठी सिडकोने तळोजा येथील मेट्रो आगारात कार्यालयासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिडकोसोबत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची पाहणी केली. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.