मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा
By Admin | Published: June 22, 2017 12:15 AM2017-06-22T00:15:29+5:302017-06-22T00:15:29+5:30
उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थिनींना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, तसेच शिकण्याची जिद्द त्यांच्या अंगी असल्याने त्या आज यशाच्या पायरीवर पोहोचल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थिनींना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, तसेच शिकण्याची जिद्द त्यांच्या अंगी असल्याने त्या आज यशाच्या पायरीवर पोहोचल्या आहेत. मुलींचे सक्षमीकरण आणि सबलीकरण होण्यासाठी समाजाने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या संचालिका अरुंधती चव्हाण यांनी के ले.नगरपरिषद आणि प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शास्त्री हॉल येथे दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी चव्हाण बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुंधती चव्हाण, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिक्षण सभापती नरेश काळे, गटनेते प्रसाद सावंत, गव्हाणकर शाळेचे विश्वस्त दादासाहेब गव्हाणकर, यासह अन्य समितीचे सभापती, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी नगरपालिका शाळेतच नव्याने खुली केलेली गव्हाणकरांची शाळा येथेच भरविण्यात येणार असल्याने या आठवी ते दहावीच्या वर्गाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, शिक्षण सभापती नरेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दहावीमध्ये ८८ टक्के मिळवून प्रथम आलेल्या ऐश्वर्या कदम, द्वितीय क्रमांक मानसी मोरे ८० टक्के, तृतीय क्रमांक मानसी मालुसरे ७८ टक्के यांना विशेषत: गौरविण्यात आले.