वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील धोकादायक शेडमुळे प्रवाशांना मनस्ताप; वळसा घालून जायची वेळ
By योगेश पिंगळे | Published: December 15, 2023 07:42 PM2023-12-15T19:42:21+5:302023-12-15T19:46:48+5:30
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेरच ही शेड असल्याने शेड खालून प्रवाशांची ये-जा सुरू असते.
योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वाशी रेल्वेस्थानकाबाहेर रेल्वे पोलिसांची वाहने, ॲम्ब्युलन्ससाठी शेड उभारले आहे. ही शेड धोकादायक झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून तिचा वापर बंद केला असून प्रवाशांनी या भागात जाऊ नये, यासाठी शेडकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना वळसा मारून रेल्वेस्थानक गाठावे लागत असल्याने प्रवाशांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेरच ही शेड असल्याने शेड खालून प्रवाशांची ये-जा सुरू असते. तिची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने यापूर्वी पावसाळ्यात तिचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली होती. मागील काही महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असल्याने तिचा वापर बंद केला आहे. याबाबतचे फलक परिसरात बसविले असून तिच्या खालून प्रवाशांनी ये-जा करू नये यासाठी रस्ता बंद केला आहे. यामुळे रघुलीला मॉलच्या बाजूने रेल्वेस्थानक गाठणाऱ्या आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. मागील काही महिन्यांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या शेडच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने विलंब झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.