नेपाळ येथील आंतराराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रायगडच्या स्पर्धकांचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:41 PM2022-11-20T13:41:04+5:302022-11-20T13:41:14+5:30
देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या सातही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
मधुकर ठाकूर
उरण :
नेपाळमध्ये तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशन"च्या सातव्या आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामध्ये जलतरण विभागाच्या विविध वयोगटात सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील सात स्पर्धकांनी १३ सुवर्ण आणि १ रजत पदकांची कमाई केली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या सातही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
संयुक्त भारत खेल फाउंडेशनच्या वतीने १७ ते १९ सप्टेंबर २०२२ रोजी इंदौर-मध्यप्रदेश येथे घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय जलतरण विभागाच्या विविध स्पर्धांमध्ये या रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली होती.तर उरणच्या आर्यन विरेश मोडखरकर,हितेश भोईर, जयदीप सिंग या तीन खेळाडूंनी विविध वयोगटातील विविध प्रकारच्या जलतरण स्पर्धांमध्ये ९ सुवर्ण पदकांची कमाई केली होती. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीची दखल घेऊन नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धाँसाठी उरणच्या या तीनही जलतरणपटुंसह रायगड जिल्ह्यातील आणखी चार अशा सात स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.
नेपाळ येथे १७ ते १९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशच्या"सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाँमध्ये जलतरण विभागातील स्पर्धेमध्ये सहभागी होत आर्यन विरेश मोडखरकर याने १७ वयोगटामधील ५० मीटर बटरफ्लाय आणि १०० मीटर फ्रिस्टाईल या प्रकारातील स्पर्धामध्ये सहभागी होत दोनही स्पर्धाँमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर हितेश भोईर याने ३० वर्ष वयोगटातील ५० मी. फ्रिस्टाईल आणि २०० मीटर आयएम या प्रकारामध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. जयदीप सिंग यानेही ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामध्ये सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. तर सचिन उल्हास शिंगरुत,संकेत म्हात्रे,सनी टाक यांनीही प्रत्येकी दोन-दोन सुवर्ण, समर्थ नाईक यांनी एक सुवर्ण एक रजत, देशासाठी १३ सुवर्ण आणि १ रजत पदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धाँमध्ये सहभागी होत रायगड जिल्ह्यातील या सातही खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे.
याआधी संयुक्त भारत खेल फाउंडेशनच्या वतीने इंदौर, मध्यप्रदेश येथे १७ ते १९ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही उरणच्या आर्यन विरेश मोडखरकर, हितेश भोईर आणि जयदीप सिंग या तीन स्पर्धकांनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. तर या तिघांनी यावेळी एकूण सहा सुवर्ण पदके पटकावली आहेत.