तक्रारदाराचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू, घटनेनं खळबळ
By वैभव गायकर | Published: September 6, 2022 08:28 PM2022-09-06T20:28:36+5:302022-09-06T20:32:43+5:30
आपापसात झालेल्या भांडणाची तक्रार करण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पनवेल: आपापसात झालेल्या भांडणाची तक्रार करण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामसिंग मोहन चव्हाण (47) असे मृताचे नाव आहे. सोमवार दि. 5 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
रोजंदारीवर मजुरीचे काम करणारे रामसिंग चव्हाण व वरूण चव्हाण(45), तरुण चव्हाण (33),लक्ष्मी राठोड यांच्यात आपापसात वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले.समोरील पक्षाने रामसिंग यांच्याविरीधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच धर्तीवर रामसिंग देखील तक्रार दाखल करण्यासाठी खारघर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना काही वेळ थांबून राहण्यासाठी सांगितले असता पोलीस ठाण्यातच अचानक रामसिंग चव्हाण (47) याचा मृत्यू झाला. या घटनेने खारघर परिसरात एकच खळबळ उडाली.मृताच्या नातेवाईकांनी खारघर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली.रामसिंग यांच्या मृत्यूची उलटसुलट चर्चा मृत्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरु झाली. या प्रकरणी खारघर पोलिसांनी वरूण चव्हाण, तरुण चव्हाण, लक्ष्मी राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिन्हीही आरोपीना खारघर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली. रामसिंग चव्हाण यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत. अचानक तब्बेत खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयत रामसिंग चव्हाण यांची तब्बेत खालावल्यावर तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
संदीपान शिंदे
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर पोलीस ठाणे )