पनवेल : सातारा-माणखटावचे विद्यमान काँग्रेस आमदार जयकुमार गोरे व त्यांचे स्वीय सहाय्यक विशाल बागल यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. खारघर येथील एका जमिनीच्या व्यवहारात भागीदारी किंवा १0 कोटी रुपयांची मागणी गोरे यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.तक्र ारदार श्रीकृष्ण गोसावी यांनी खारघर येथे कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी रामचंद्र भातोसे व रामचंद्र जाधव यांच्याकडून जमीन खरेदी केली आहे. आमदार जयकुमार गोरे यांचे पीए बागल यांनी वारंवार फोन करून गोसावी यांना भेटावयास बोलावले. भेटल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यानंतर पुण्यातील हॉटेल आॅर्चिड येथे रात्री ११.३0 वाजता जयकुमार गोरे यांच्यासोबत त्यांची भेट झाली. त्यावेळी तुम्ही विकत घेतलेल्या जमिनीमध्ये भागीदारी द्या किंवा रोख १0 कोटी रु पये देण्याची मागणी आमदार गोरे यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.‘मुख्यमंत्र्यांना सांगून तुमच्या जागेची परवानगी रद्द करून टाकेन. तुम्हाला व्यवहार पुढे सुरळीत करायचा असेल, तर तुम्ही मला भागीदारी द्या किंवा रोख दहा कोटी रु पये द्या’, अशी धमकी गोरे यांनी दिल्याचा आरोप गोसावी यांनी केलेल्या लेखी तक्रारीद्वारे केला आहे. विशेष म्हणजे आपण या प्रस्तावाला नकार दिल्यानंतर गाडीतून तुम्ही सुखरूप कसे जाता तेच मी पाहतो, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी आमदार गोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. दरम्यान, याप्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.>याआधीही गुन्हे नोंदआमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात २0१७ मध्येअश्लील व्हिडीओ आणि एसएमएस पाठविल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही झाली होती. तसेच २0१५ मध्ये दोन गटांत झालेल्या दगडफेकप्रकरणी देखील गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:54 AM