पालिकेची आरोग्य व्यवस्था कोमात
By admin | Published: August 5, 2015 12:18 AM2015-08-05T00:18:34+5:302015-08-05T00:18:34+5:30
डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही जादा बेड
नवी मुंबई : डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही जादा बेड टाकण्याची वेळ आली आहे. बहुतांश रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग फुल्ल असून रुग्णांना उपचारांसाठी मुंबईत जावे लागत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी आरोग्यव्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनावर १५० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करत आहे. परंतु तरीही आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. नेरूळ व तुर्भेमधील माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. ऐरोलीतील रुग्णालय नावापुरतेच आहे. कोपरखैरणेमधील रुग्णालयाची वास्तूही धोकादायक झाली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांपेक्षा जास्त असून पालिकेचे एकमेव प्रथम संदर्भ रुग्णालय शिल्लक आहे. तिथे फक्त ३०० बेड आहेत. शहरात डेंग्यू, मलेरिया व तापाची साथ पसरली आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रोज १५०० ते १८०० रुग्ण येत आहेत. रुग्णालयामधील अतिदक्षता विभाग, ट्रॉमा सेंटर फुल्ल झाले आहे. जागा नसल्यामुळे रुग्णांना परत पाठवावे लागत आहे.
सोमवारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सोनोग्राफी व एक्स-रे विभागांत प्रचंड गर्दी झाली होती. अनेक रुग्णांना परत पाठवावे लागले. शहरात जवळपास ६१ रुग्णालये आहेत. अतिदक्षता विभागाची सोय असलेल्या बहुतेक ठिकाणी जागा फुल्ल झाली आहे. ज्या ठिकाणी सुविधा आहे तेथेही रुग्णांना दाखल करण्यापूर्वी २० ते ४० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे. अपघात व इतर आजारांमध्ये ज्यांना अतिदक्षता विभागात ठेवणे आवश्यक आहे, त्यांना सायन, जे. जे. व इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये जागा मिळाली तरी बिल सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णवाहिकाही कमी खर्चात मिळत नाही. गरीब रुग्णांचा जीव जात असताना प्रशासन शांत बसले आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाखांपेक्षा जास्त झाली असून त्यांच्यासाठी महापालिकेचे वाशीमध्ये ३०० बेडचे एकच रुग्णालय आहे. तुर्भेतील माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. नेरुळचे रुग्णालयही बंदच आहे.
ऐरोली रुग्णालय फक्त नावापुरते सुरू असून कोपरखैरणेतील इमारतही धोकादायक बनली असून त्या रुग्णालयाचाही पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. एका रुग्णालयावर ताण पडत असून गरीब रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.