विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:42 AM2018-05-14T05:42:24+5:302018-05-14T05:42:24+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोबरोबरच आता राज्य शासनानेही कंबर कसली आहे
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोबरोबरच आता राज्य शासनानेही कंबर कसली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांनी रविवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देवून कामाची पाहणी केली. तसेच हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय वाढविण्याच्या सूचना सिडकोला दिल्या.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सध्या प्रकल्पपूर्व कामाचा धडाका सुरू आहेत. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या कार्यकाळात विमानतळ प्रकल्पाला प्राप्त झालेली गती कायम राहावी, यादृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. मुख्य सचिव जैन यांच्या विमानतळ प्रकल्प भेटीकडे याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहेत. या भेटी दरम्यान जैन यांनी सुरू असलेल्या प्रकल्पपूर्व कामांचा आढावा घेतला. यात उलवे टेकडीचे सपाटीकरण, भरावाची कामे, नदीचे पात्र बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण करणे आदी कामांचा समावेश होता. विमानतळाच्या उभारणीचे काम मे. एमआयएएलचे मुख्य भागीदार असलेल्या जीव्हीके कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जैन यांनी सिडकोला दिल्या. यावेळी त्यांनी पुनर्वसन आणि पुनर्स्थापना क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांचीही पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीलाही भेट दिली. सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सादरीकरणाद्वारे विमानतळ प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची यावेळी माहिती दिली. या दौऱ्यात सिडकोचे अधिकारी सहभागी झाले होते.