पावसाळापूर्व कामे २५ मे आधी पूर्ण करा
By admin | Published: May 13, 2017 01:18 AM2017-05-13T01:18:55+5:302017-05-13T01:18:55+5:30
कोणतीही आपत्ती पूर्वसूचना देवून येत नाही. यामुळे पावसाळापूर्व सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. आवश्यक ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोणतीही आपत्ती पूर्वसूचना देवून येत नाही. यामुळे पावसाळापूर्व सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिल्या आहेत.
शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आपत्ती विभागाचे प्रमुख अंकुश चव्हाण यांनी आतापर्यंत केलेली कामे व यापुढे करण्यात येणारी कामे याविषयी माहिती दिली. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेवून पाणी साचण्याची ठिकाणे व दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे यांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होल्डिंग पाँडच्या फ्लॅपगेटची दुरुस्ती करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयामध्ये मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी पावसाळी कालावधीत १जूनपासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सर्व विभाग कार्यालयांमध्ये २५ मेपासून आपत्कालीन कक्ष सुरू केला जाणार आहे. पालिका आयुक्त रामास्वामी यांनी नालेसफाईची सर्व कामे २५ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्त्यांवरील खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे. खोदलेले चर भरण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. पावसाळी कालावधीमध्ये नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. आपत्तीमध्ये कमीत कती वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत संदेश पोहचविण्यासाठी मोबाइल कंपन्यांची मदत घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये स्वयंसेवी संस्था, मंडळे, पोहणाऱ्या व्यक्ती, विविध प्रकारच्या मदतकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचे संपर्कध्वनी एकत्रित करून त्याची सूची अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खदाण क्षेत्रामध्ये बुडून मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी धोक्याच्या सूचना देण्यात याव्यात. विद्युत बॉक्सची सर्व झाकणे बसविण्यात यावीत अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
पावसाळ्यात सर्वांमध्ये समन्वय आणि सुसंवाद महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे.तत्काळ मदतीसाठी तत्पर असावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, अमरिश पटनिगिरे, दादासाहेब चाबुकस्वार, तुषार पवार, शिरीष आरदवाड, रेल्वेचे आर. के. देवांद, एमटीएनएलचे राजाराम, सिडकोचे नितीन देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त पी. जी. माने, अनिल शिंदे, कोस्टल गार्डचे प्रवीण कुमार, आरटीओचे सचिन पाटील, एमआयडीसीचे प्रकाश चव्हाण, एस.पी. आव्हाड, महावितरणचे पी. डी. अन्नछत्रे, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशनचे एम. एम. ब्रम्हे, एपीएमसीचे एस. एम. मोहाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.