पनवेल : सिडकोने खारघरमध्ये उभारलेल्या गोल्फ कोर्समधील अद्ययावत क्लब हाऊसचे काम पूर्ण झाल्याने १ एप्रिलपासून हंगामी सदस्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.सिडकोने खारघर सेक्टर २२ मध्ये सुमारे १०३ हेक्टरवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. एकूण १८ होल असलेल्या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ११ होलचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी देश- विदेशातील खेळाडू गोल्फ खेळत असतात. याठिकाणी क्लब हाऊस उभारण्यात आले असले तरी अंतर्गत सजावटीच्या कामामुळे धूळखात पडून होते. खेळाडूंसाठी विश्रामगृह, अद्ययावत हॉटेल, कँटीनची सोय नव्हती. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत होती. सिडकोने जूनमध्ये क्लब हाऊसच्या अंतर्गत कामाला सुरु वात केली. सदर काम पूर्ण झाल्याने १ एप्रिलपासून ते हंगामी सदस्यांसाठी खुला केला जाणार आहे. सध्या केवळ हौशी खेळाडूंना काही तासांसाठी शुल्क आकारून खेळण्याची मुभा दिली जात आहे. मात्र आता क्लब हाऊसची अंतर्गत सजावट केल्याने पाच वर्षांसाठी हंगामी सदस्यत्व देण्यास सुरु वात केली जाणार आहे. सिडकोने क्लब हाऊसचे काम एका खासगी संस्थेला दिले आहे. त्यामुळे पाच वर्षांसाठी पाच लाख रु पये आकारून हंगामी सदस्यत्व देण्यास सुरु वात केली जाणार आहे. सकाळी साडे सहाला खुले होणारे गोल्फ कोर्स सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत सुरू ठेवला जाणार आहे. आजवर केवळ दैनंदिन खेळाडूंना सोमवार ते शुक्रवारपर्यंत ६०० रुपये आणि शनिवार व रविवारी १२०० रु पये आकारण्यात येत होते. विद्यार्थी, सिडको कर्मचाऱ्यांना सवलत असून शिकवणीसाठी वेगळे शुल्क आहे. परदेशी नागरिकांसाठी तिप्पट दर आकारण्यात आला आहे. आता सदस्यांसाठी पाच लाख, सात लाख आणि दहा लाख रु पये शुल्क निश्चित केले आहे. आजीव सदस्यत्व, सदस्यत्व आणि कॉर्पोरेट सदस्यत्व अशी वर्गवारी आहे.गोल्फ कोर्समधील क्लब हाऊसचे काम पूर्ण झाले आहे. १ एप्रिलपासून हंगामी सदस्यत्व देण्यास सुरु वात केली जाणार आहे. या अद्ययावत क्लब हाऊसमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.- सीताराम रोकडे,प्रशासक, सिडको, खारघर
गोल्फ कोर्समधील क्लब हाऊसचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:27 AM