नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामधील उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या परिसरातील ९६ मीटर उंचीच्या डोंगराचे सपाटीकरण केले आहे. त्या ठिकाणी ३.२ किलोमीटरचा चॅनेल काढून नदीचा प्रवाह वळविण्यात आला आहे.सिडको अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी सोमवारी विमानतळ प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील कामांची पाहणी केली. उलवे नदीचा प्रवाह बदलणे हे विमानतळाच्या विकासपूर्व कामांपैकी एक महत्त्वाचे काम आहे. प्रवाह बदलण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एप्रिल २०१७ पासून सिडकोने विकासपूर्व कामांना सुरवात केली. या कामांमध्ये उलवे टेकडीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह वळविणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे यांचा समावेश होता. सिडको आणि सवलतधारक कंपनी यांच्यात झालेल्या नोव्हेशन करारानंतर विमानतळ गाभा क्षेत्राचे हस्तांतरण सिडकोतर्फे सवलतधारक कंपनीस करण्यात आले आहे. विकासपूर्व कामांपैकी उलवे नदीचा प्रवाह वळविणे हे तुलनेने महत्त्वाचे व आव्हानात्मक काम होते. विमानतळ परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी शिफारशी करताना केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन पुणे यांनी उलवे नदीचा प्रवाह बदलण्याची शिफारस केली होती. त्यानुसार या परिसरातील ९६ मीटर उंचीच्या टेकडीचे सपाटीकरण करून त्या जागेतून ३.२ किलोमीटरचा चॅनेल तयार केला आहे. नदी प्रवाह बदलण्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. विमानतळ परिसराची कामांची पाहणी करताना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासोबत आर.बी. धायटकर, एन. सी. बायस, प्रणित मूल, संजय दाहेदार, प्रिया रातांबे, एस. एस. गोसोवी व इतर अधिकारी उपस्थित होते.
उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:50 AM