केंद्रीय अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:28 PM2019-02-01T23:28:34+5:302019-02-01T23:28:53+5:30
व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीयांना गोंजारण्याचे प्रयत्न केले असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.
केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी नवी मुंबईकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीयांना गोंजारण्याचे प्रयत्न केले असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले असून शहरवासीयांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया .....
पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला जी सूट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्यामध्ये नक्की काय तरतूद केली आहे हे स्पष्ट झाले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही किंवा शेतमजुरांसाठी देखील या बजेटमध्ये काहीही नाही. मध्यमवर्गीय नागरिकच मोठ्या प्रमाणावर मतदार असतात त्यांना थोड्या प्रमाणावर गोंजारण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आला असून निवडणुकांपूर्वी ज्याप्रमाणे बजेट असतो त्याअनुषंगाने बजेट आहे.
- नीलेश पाटील, सी.ए
सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून बजेट मांडण्यात आले आहे. बाजारात देखील बजेट चांगले असल्याची भावना व्यापारी वर्गात आहे. शेतकरी वर्गाला देखील बजेटच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. बजेटबाबत व्यापारी वर्गात आनंद आहे.
- शरद मारू, अध्यक्ष,
ग्रेन राईस अॅण्ड आॅइल सीड्स मर्चंट असोसिएशन
आयकर पाच लाखांपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, हे दिलासादायक आहे. जीएसटी प्रत्येक महिन्याऐवजी तिमाही कर भरावे लागणार आहेत, ही बाबदेखील महत्त्वाची आहे. हौसिंग लोनमध्ये लागणारी जीएसटी कमी करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली आहे, ती समिती याबाबत निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे, शेतकरी वर्गाला दिलासादायक हा अर्थसंकल्प आहे. दोन हेक्टर पेक्षा कमी असलेल्या शेतकºयांना वर्षभरात सहा हजार रुपये सरकार देणार आहे.
- विश्वास भंडारी, सनदी लेखापाल
सरकारने अर्थसंकल्पात आज काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, त्यामध्ये संरक्षण खात्याच्या निधीमध्ये केलेली वाढ ही उल्लेखनीय आहे. रेरा कायदा आणल्यामुळे रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता येऊन ग्राहकांना फायदेशीर ठरेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीवेतन आणि बोनसची घोषणा केल्याने त्यांनादेखील दिलासा मिळाला आहे.
- के. डी. राठोड, बांधकाम व्यावसायिक
बांधकाम व्यवसायात जीएसटीमध्ये सवलत मिळाल्यास नक्कीच अर्थसंकल्पातील या निर्णयाचे स्वागत आहे. सर्वसामान्यांना परवडणाºया घरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार रु पये मिळत होते; परंतु त्यामध्ये दोन ते सव्वा दोन लाख रु पये जीएसटीच जात होता. जीएसटीमध्ये सवलत दिल्यास खरा आवास योजनेचा फायदा नागरिकांना होऊ शकेल.
- प्रकाश बाविस्कर,
बांधकाम व्यावसायिक
देशातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी या सर्व घटकांचा विचार करून बजेट मांडण्यात आले आहे. या बजेटबाबत मी आनंदी आहे.
- मोहन गुरनानी, अध्यक्ष,
फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र
गरीबवर्ग, शेतकरी, कामगारवर्ग, ज्येष्ठ नागरिक, सैनिक थोडक्यात समाजातील सर्वच घटकांना सामावून घेणारा ‘न भूतो’ असा हा अर्थसंकल्प आहे. अर्थात आगामी निवडणूक समोर ठेवून सर्वांना खूश करणारा हा अर्थसंकल्प आहे.
- दीपक शिंदे, नागरिक, खारघर
व्यापारी व व्यावसायिक यांच्या दृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. लघुउद्योग व मध्यम उद्योगाला कर्जामध्ये दोन टक्के सूट देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. टीडीएस लिमीट दहा हजारांवरून ४० हजारांपर्यंत केले आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे.
- श्यामसुंदर कारकून, सदस्य, तळोजा मॅनिफॅक्चरिंग असोसिएशन,
व्यापारी वर्गासाठी सर्वात चांगला अर्थसंकल्प आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, या अर्थसंकल्पात व्यापारी वर्गाला नाराजदेखील करण्यात आलेले नाही. सरकारी नोकरदार वर्गाच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक अर्थसंकल्प आहे.
- जयेश गोगरी, व्यापारी, खारघर