नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद, तीन ठिकाणी रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 02:57 AM2020-01-25T02:57:37+5:302020-01-25T02:58:13+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ऐरोली, रबाळे व तुर्भे येथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दुपारनंतर त्यांची सुटका केली.
नागरिकत्व सुधारणा कायदा व देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. हा बंद शांततेत होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार नवी मुंबईत शांततेत बंद पाळण्यात आला. त्यास काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. बंदच्या अनुषंगाने पोलिसांनी गुरुवारीच वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख व्यक्तींसोबत बैठका घेतल्या होत्या. या वेळी बंदला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याशिवाय अनपेक्षित प्रकार टाळण्यासाठी शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्तही लावण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. दरम्यान, ऐरोली, रबाळे व तुर्भे येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
या वेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दुपारनंतर त्यांची सुटका केली. त्यानंतर संध्याकाळी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामूहिक बैठक घेऊन बंदचा समारोप करण्यात आला. या वेळी वंचित आघाडीचे राज्य सचिव राजाराम पाटील, जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांच्यासह
१०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नवी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात हा बंद झाल्यानंतर वाशीत त्याचा समारोप करण्यात आला. बंद दरम्यान तीन ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता.
- वीरेंद्र लगाडे,
जिल्हा अध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी
ऐरोली, दिघ्यात कार्यकर्त्यांची धरपकड
नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्टÑीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई शाखेच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ ऐरोली आणि दिघा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी पोलिसांनी ३० ते ४० आंदोलकांना ताब्यात घेऊन दुपारनंतर सोडून दिले.
सीएए कायदा लागू करण्यामागे केंद्र सरकारची दडपशाही आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, त्यामुळेच बंद पाळून सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे. ऐरोलीत बंद शांततेत पाळण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई शाखेचे संघटक राम भद्रे यांनी दिली. बंदमुळे वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाही, याबाबतही दक्षता घेतल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे-बेलापूर महामार्गावर दिघा येथे सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी २० ते २५ जणांना ताब्यात घेतले. मात्र, थोड्याच वेळात त्यांना सोडून दिले. त्यानंतर याच संघटनेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी ऐरोली-मुलुंड मार्गावर आंदोलन केल्यामुळे रबाळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना दुपारनंतर सोडण्यात आले. सकाळपासूनच पोलिसांकडून ऐरोली परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.