नवी मुंबई : किडनी स्टोनची शस्त्रक्र्रिया करण्यासाठी २० ते २५ हजार रूपये खर्च होतो. मात्र शस्त्रक्रिया न करता पाचशे ते एक हजार रूपयांच्या औषधाने हा आजार बरा करण्याचा दावा पेणमधील विश्वास धुमाळ करत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोणतीच वैद्यकीय पदवी नाही. कंपाउंडर असूनही किडनी स्टोनच्या (मुतखडा) रूग्णांवर उपचार करत असल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आले आहे. शस्त्रक्रिया न करता किडनी स्टोन बरा करण्याचा दावा विश्वास धुमाळ करत असल्यामुळे पूर्ण रायगडसह नवी मुंबई परिसरातून रुग्ण जोहेला उपचारासाठी जात आहेत. स्टोन काढण्यासाठीची शस्त्रक्रिया करण्यासाठी शहरामध्ये २५ ते ५० हजाररुपये खर्च करावे लागत आहेत. याशिवाय शस्त्रक्रियेचे व्रण कायम अंगावर राहतात. काही ठिकाणी अत्याधुनिक तंत्राद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते, मात्र ती उपचार पद्धतीही खर्चिक आहे. यामुळे धुमाळ यांच्याकडे उपचारासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञ डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुमाळ यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही वैद्यकीय पदवीच नाही. पनवेलजवळील कोंबडभुजे गावातील दीपक दांडेकर यांनी त्यांच्याविषयी रायगड जिल्हाधिकारी, पोलिसांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वत्र तक्रार केली आहे. बोगस डॉक्टर असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याविषयी वस्तुस्थिती पाहण्यासाठी लोकमतच्या टीमने जोहे येथे जावून प्रत्यक्षात पाहणी केली असता तक्रार केलेली व्यक्ती स्वत: रुग्णांवर उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. दादर सागरी पोलीस स्टेशन असलेल्या इमारतीच्या मागील बाजूला धुमाळ कुटुंबीयांचे घर आहे. घराच्या एका खोलीमध्ये ते रुग्णांवर उपचार करतात. घराच्या बाहेर माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. धुमाळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचे नामफलक आहेत. प्रत्यक्षात रुग्ण तपासणाऱ्या विश्वास धुमाळ यांच्या नावाचा कुठेच उल्लेख नाही. लोकमतच्या टीमने जवळपास दोन तास धुमाळ यांच्या दवाखान्यामध्ये थांबून तेथील कामकाजाविषयी माहिती घेतली. तेथे येणाऱ्या रुग्णांचा एक्सरे किंवा सोनोग्राफीचा अहवाल पाहून त्यांना इंजेक्शन व गोळ्या दिल्या जात आहेत. सर्व औषधे रुग्णालयातीलच दिली जात होती. मेडिकलमधून घ्यावी लागतील अशी औषधे शक्यतो दिली जात नव्हती. वार्ताहरांनी त्यांच्या नातेवाइकांचा सोनोग्राफीचा रिपोर्ट डॉक्टरांना दाखविला. आम्हाला शस्त्रक्रिया करायची नाही असे सांगितले. यावर धुमाळ शस्त्रक्रियेची काहीही गरज नाही. मी औषधाने ६ वर्षांच्या मुलाला झालेल्या किडनी स्टोनचा आजारही बरा केला आहे. तुम्ही चिंता करू नका. रुग्णास घेवून या, आपण त्यांना नक्की बरे करू असे सांगितले. कंपाऊंडर असणारे विश्वास हे स्वत:च डॉक्टर म्हणून उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी यापूर्वीही तक्रारी केल्यानंतरही शासकीय यंत्रणेने काहीच दखल घेतलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कंपाउंडर करतो किडनी स्टोनवर उपचार !
By admin | Published: January 28, 2017 3:02 AM