- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उद्याने व मोकळ्या जागांवरील हिरवळीची देखभाल करण्यासाठी सर्वसमावेश ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. २० ऐवजी ९ ठेकेदाराच नियुक्त करण्याचा ३५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वृक्षलागवड, संवर्धन, स्थापत्य व विद्युतविषयी कामांची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात येणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये उद्यान व ट्री बेल्ट विकसित करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीमध्ये १५८ उद्याने व ट्री बेल्टसह वृक्षलागवड असलेली एकूण १२२ ठिकाणे आहेत. ८ थीम पार्कचाही समावेश आहे. दोन्हींनी तब्बल ११ लाख १९ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ एवढी जागा व्यापली आहे. उद्यानांची व ट्री बेल्टची देखभाल करण्यासाठी २० ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये उद्यानाचे ठेकेदार उद्यानातील हिरवळीस पाणी देणे, गवत काढणे, कीटकनाशकांची फवारणी करणे, हिरवळ लागवड करणे, लाल माती व शेणखत टाकण्याचे काम करत आहेत. उद्यानाचे प्रवेशद्वार, पदपथ, संरक्षण भिंतीची दुरुस्ती, उद्यानातील खेळण्यांची दुरुस्ती, पाणी व्यवस्था, दिवाबत्ती ही कामे चार विभागांकडून विविध ठेकेदारांकडून करून घेतली जात आहेत. उद्यानाची कामे पाच विभागांमध्ये विभागली गेली असल्यामुळे कामामध्ये सुसूत्रता येत नाही. नागरिकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन सुधारणा करता येत नाही. उद्यानाच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी सर्वसमावेश ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पूर्वीचे ठेकेदार कमी करून प्रत्येक विभाग कार्यालयासाठी व ठाणे-बेलापूर व पामबीच रोड मिळून ९ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे. उद्यानाची देखभाल दुरुस्ती, संवर्धन व सुरक्षा व्यवस्थेसाठी २४ कोटी ९८ लाख २६ हजार रुपये, स्थापत्य दुरुस्ती,विद्युत दुरुस्तीच्या कामांसाठी ८ कोटी ३९ लाख २३ हजार रुपये व खेळणी दुरुस्तीसाठी २ कोटी असा एकूण ३५ कोटी ३७ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. उद्यानांमधील कर्बस्टोन दुरुस्ती,रंगकाम करणे, झाडांची छाटणी करणे, पाण्याची व्यवस्था एकाच ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे. यामुळे उद्याने, चौक,रस्ता दुभाजक संवर्धन व संरक्षण योग्य पद्धतीने होऊन शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. महापालिकेने यापूर्वी पाणीपुरवठा, मलनि:सारण,वंडर्स पार्क या विभागांमध्ये सर्वसमावेशक कंत्राटे दिली असून, त्याच पद्धतीने उद्यान विभागाचे काम केले जाणार आहे. सर्वसाधारण सभेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रकल्पग्रस्तांच्या कामावर गंडांतरमहानगरपालिकेने उद्यानांची योग्य पद्धतीने देखभाल करता यावी यासाठी सर्वसमावेशक ९ ठेकेदार नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. विभाग कार्यालयनिहाय व ठाणे-बेलापूरसह पामबीचसाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून उद्यान देखभालीची कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदार करत आहेत.प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना यामुळे हक्काचा रोजगारही उपलब्ध झाला आहे. सर्वसमावेशक ठेकेदार नियुक्तीमुळे प्रकल्पग्रस्तांच्या हातामधून ही कामे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सर्वसमावेशक ठेकेदार नसल्याने होणारे नुकसानउद्यानांमध्ये संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, पदपथाच्या टाईल्स तुटलेल्या असतात. देखभालीच्या ठेकेदाराकडे ही जबाबदारी नसते.पुतळे व इतर रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती वेळेत होत नसल्याने उद्याने विद्रूप दिसतात.उद्यानात सुरक्षारक्षक नसल्यास हिरवळीवर फुटबॉल व इतर मैदानी खेळ सुरू असल्याने उद्यानाचे नुकसान होते.उद्यानातील खेळण्यांवर मोठ्या व्यक्ती बसत असल्यामुळे खेळणी तुटत आहेत.उद्यानातील सुरक्षारक्षकाची जबाबदारी दुसऱ्या संस्थेची असल्यामुळे उद्यानाचे गेट उघडणे व बंद करणे योग्य पद्धतीने होत नाही.उद्यानातील विद्युत दिव्यांची बºयाच वेळा मोडतोड होते किंवा बल्ब फोडले जातात, बल्ब बंद होतात त्यामुळे उद्यानामध्ये मद्यपान व इतर गैरप्रकार होत असतात.
उद्यान देखभालीसाठी सर्वसमावेशक ठेकेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:33 AM