विद्युत वाहिन्यांखालील जागांच्या भाडेकरारावर संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:16 AM2018-08-05T02:16:54+5:302018-08-05T02:17:02+5:30

उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील जागेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा भाडेकरार रद्द करण्याच्या कार्यवाहीला सिडकोने सुरुवात केली आहे.

Compressed on the lease agreement under the electricity channels | विद्युत वाहिन्यांखालील जागांच्या भाडेकरारावर संक्रात

विद्युत वाहिन्यांखालील जागांच्या भाडेकरारावर संक्रात

Next

- सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील जागेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा भाडेकरार रद्द करण्याच्या कार्यवाहीला सिडकोने सुरुवात केली आहे. एरोली येथील दुर्घटनेनंतर विद्युत वाहिन्यांखाली होणा-या नागरी वावरामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानुसार केवळ नर्सरीच्या वापरासाठी दिलेल्या भूखंडावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे त्यांचे करार रद्द केले जाणार आहेत.
मुख्य विद्युत केंद्रातून शहरांमध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी अतिउच्च आणि उच्चदाबाच्या विद्युत वायर शहराच्या रहिवासी भागातून गेल्या आहेत. अशा सर्वच जागा अद्यापही सिडकोच्या ताब्यात आहेत. त्याठिकाणी अनधिकृतपणे नागरी वसाहत उभी राहणार नाही, याकरिता बहुतांश जागा नर्सरीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी पालिकेने उद्याने विकसित केली आहेत; परंतु अतिउच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली उद्यानदेखील नसावे, अशी सूचना महापारेषणने पालिकेकडे केलेली आहे. त्यानंतरही ऐरोलीत विकसित करण्यात आलेल्या उद्यानात घडलेल्या दुर्घटनेमुळे एका महिलेला मृत्युशी झुंज द्यावी लागत आहे. उपरी विद्युत वायरच्या इन्शुलेटरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. या वेळी विजेच्या ठिणग्या संपूर्ण परिसरात उडाल्या होत्या. सुदैवाने पावसामुळे गवत ओले असल्याने आगीची घटना घडली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे अति उच्च व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील जागेत नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यावसायिक उद्देशाने तसेच अतिक्रमण टाळण्यासाठी सिडकोने अशा बहुतांश जागा फक्त नर्सरीसाठी भाड्याने दिल्या आहेत; परंतु मागील काही वर्षांत संबंधितांकडूनच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. नर्सरीच्या कामगारांसाठी पक्की तसेच पत्र्याची बांधकामे करण्यात आली आहेत. तर काही ठिकानी चायनिस सेंटर चालवले जात आहेत. यामुळे सिडकोच्या धोरणाला संबंधितांकडून हरताळ बसत आहे. तर पालिकेनेही रबाळे परिसरात अनेक ठिकाणी उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली सार्वजिक शौचालय उभारले आहेत. त्यावर एखादी व्यक्ती चढल्यास त्याचा उपरी वायरला सहज स्पर्श होऊ शकतो. यासंदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर देखील अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे, यामुळे अशा ठिकाणी भविष्यात दुर्घटनेचीही शक्यता निर्माण झाली आहे.
ऐरोली येथील दुर्घटनेनंतर सिडकोनेही याचे गांभीर्य घेतले आहे. त्यानुसार काही दिवसांत उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांचा नव्याने सर्व्हे केला जाणार आहे. या वेळी त्या ठिकाणी अतिक्रमण अथवा रहिवासी वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांचे करार रद्द करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात वायरवरून टपकणाºया पाण्याच्या धारांमधून विद्युतप्रवाह वाहू शकतो. अशा वेळी त्या ठिकाणी एखादी व्यक्ती असल्यास त्याला विजेचा झटका लागून मृत्यूच्या दाढेत जावे लागू शकते. त्यामुळे उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली नागरी वावर टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
>अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील मोकळी जागा केवळ नर्सरीच्या वापरासाठी भाड्याने देण्यात आलेली आहे. यानंतरही काही ठिकाणी पक्के अथवा पत्र्याचे बांधकाम करून कामगारांचे वास्तव्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा जागांची पाहणी करून संबंधितांचे भाडेकरार रद्द करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणार आहे.
- डॉ. मोहन निनावे,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको
>अतिउच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील जागा नागरी सुरक्षेसाठी मोकळी ठेवणे आवश्यक आहे; परंतु सिडको व पालिका अधिकाºयांकडून त्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी नर्सरी, शौचालय तसेच उद्याने उभारून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल.
- अभयचंद्र सावंत,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Compressed on the lease agreement under the electricity channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज