मयुर तांबडे
नवीन पनवेल - दोन हजार रुपयांच्या नोटा 23 मे पासून स्टेट बँकेत बदलून मिळत आहेत. मात्र याच नोटा बदलीसाठी नवीन पनवेल, सेक्टर तीन येथील स्टेट बँकेच्या शाखेत अर्ज भरण्याची सक्ती केली जात असल्याचे समोर आले आहे. एका सुजाण नागरिकाने हा फॉर्म भरण्यास नकार दिला व मॅनेजरच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर फॉर्म भरण्याचे बंद करण्यात आले.
नवीन पनवेल शहरातील सेक्टर तीन, पाण्याच्या टाकी समोर स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत काही नागरिक वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी गेले असता तेथील कॅशियरने त्यांना एक फॉर्म भरण्यास दिला. या फॉर्ममध्ये ग्राहकाचे नाव, सही, ओळखपत्र, बँक अकाउंट नंबर लिहीण्यास सांगितले. काही नागरिकांनी तसे लिहून देखील दिले. मात्र एका सुजाण नागरिकाच्या हे लक्षात येताच त्याने हा प्रकार शाखा व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिला. त्यावेळी त्यांनी कॅशियरला हा फॉर्म भरून न घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पुन्हा कॅशियरने आधार कार्ड मागितले, मात्र आधार कार्ड देण्यास या सुजाण नागरिकाने पुन्हा नकार दिला.
पुन्हा घडलेला सर्व प्रकार शाखा व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर कशियरने आधार कार्ड घेतला नाही. मात्र तरी देखील रजिस्टरवर ग्राहकाचा नाव, फोन नंबर लिहून घेण्यात आला आहे. शासनाने 20 हजाराच्या नोटा बदलून देण्यासाठी बँकेकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्र घेतली जाणार नाही असे सूचित केले आहे. मात्र तरी देखील या बँका शासनाच्या नियमांना तिलांजली देत आहेत. व आपले नियम ग्राहकांवर लादत असल्याचे दिसून येत आहे. नोट बदलीसाठी फॉर्म भरण्याची सक्ती करून व कागदपत्रे मागून घेऊन ग्राहकांवर आपले नियम लादणाऱ्या बँकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.