संगणक शिक्षण होणार स्मार्ट

By admin | Published: February 2, 2016 02:10 AM2016-02-02T02:10:58+5:302016-02-02T02:10:58+5:30

महापालिका शाळांतील घरघर लागलेल्या संगणक कक्षांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Computer education will be smart | संगणक शिक्षण होणार स्मार्ट

संगणक शिक्षण होणार स्मार्ट

Next

नवी मुंबई : महापालिका शाळांतील घरघर लागलेल्या संगणक कक्षांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात रखडलेली निविदा प्रक्रियासुध्दा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या संगणक शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या ६५ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने सात वर्षांपूर्वी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. या ठेक्याची मुदत २0१४ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर नवीन ठेकेदार नेमण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नाही. याचा परिणाम म्हणून तेव्हापासून शाळांतील संगणक कक्ष धूळखात पडून आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताचा हवाला देत नवी मुंबई विकास अधिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरी यांची भेट घेवून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार पटनिगीरी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना उपरोक्त आश्वासन दिले आहे. संगणक शिक्षण पूर्ववत करण्याच्या दृष्टीने १५ फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे मागील वर्षभरापासून संगणक कक्ष बंद पडले आहेत. तसेच अनेक केंद्रातील संगणक नादुरुस्त असल्याची बाब शिष्टमंडळातील सदस्यांनी पटनिगीरी यांच्या निदर्शनास आणून दिली. ही गंभीर बाब असून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रत्येक शाळेत जावून आतापर्यंत शिकविल्या गेलेल्या संगणकीय प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांकडून आढावा घेतला जाईल. त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही पटनिगीरी यांनी स्पष्ट केल्याचे डोके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Computer education will be smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.