नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील शिल्लक राहिलेल्या ११०० घरांसाठी गुरुवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात ही सोडत प्रक्रिया पार पडली. या सोडतीचा निकाल सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.सिडकोने आॅगस्ट २०१८ मध्ये १५ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या या गृहनिर्माण प्रकल्पाला राज्यभरातून सुमारे दोन लाख अर्जदारांनी अर्ज भरले होते. यातील पात्र अर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली; परंतु काही विभागातील घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे या गृहप्रकल्पातील ११०० घरांची विक्री झाली नाही. या शिल्लक घरांत ७३ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, तर उर्वरित १०२७ सदनिका या अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी होत्या. या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते.अर्ज सादर करण्याच्या ३१ जानेवारी या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ५८७०० ग्राहकांनी घरांसाठी अर्ज केले होते. छाननीनंतर यातील केवळ चार अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले. उर्वरित अर्जाची गुरुवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. या वेळी पर्यवेक्षण समितीचे सदस्य निवृत्त सनदी अधिकारी व माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार व एनआयसी (मुंबई) मोईझ हुसेन हे या वेळी उपस्थित होते. या वेळी उपस्थित काही अर्जदारांनाही पंच म्हणून संधी देण्यात आली. प्रोबिटी सॉफ्ट व म्हाडा यांनी विकसित केलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीचा या सोडतीसाठी वापर करण्यात आला.
शिल्लक घरांसाठी संगणकीय सोडत; सिडकोच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 2:31 AM