बिरवाडी : मागील दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यात शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही निर्णय न घेतल्यामुळे राज्यातील सुमारे २७ हजार संगणक परिचालक १२ एप्रिलला मुंबई येथे विधान भवनवर धडकणार असल्याची माहिती राज्य सचिव मयूर कांबळे यांनी दिली.मागील ४ वर्षात ग्रामविकास विभागामार्फत महाआॅनलाइनकडून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये संगणक परिचालकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानुसार प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांनी सलग ३ वर्षे संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्र मांकावर ठेवला. तरीही कंपनीने संगणक परिचालकांची पिळवणूक करून महाआॅनलाइनने ४ वर्षात मानधन, स्टेशनरीमध्ये शेकडो कोटी रु पये हडप केलेले आहेत. संगणक परिचालकांना ५० रु ., २०० रु ., ५०० पासून ३८०० असे तुटपुंजे मानधन देऊन आर्थिक व मानसिक त्रास दिला. मानधन वेळेवर होत नसल्यामुळे ४ संगणक परिचालकांनी आत्महत्या केल्या आणि राहुल चौखंद्रे यांचानागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ८ दिवस चाललेल्या आंदोलनात मृत्यू झाला. त्यावेळी शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांनी २२ डिसेंबर २०१५ ला आश्वासन देऊन १५ जानेवारी २०१६ पर्यंत निर्णय देऊ असे सांगितले होते,परंतु एप्रिल आला तरी शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे राज्य संघटनेच्या निर्णयानुसार १२ एप्रिलला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्यसचिव कांबळे यांनी सांगितले.
संगणक परिचालक धडकणार मुंबईत
By admin | Published: April 09, 2016 2:22 AM