सिडकोच्या १० हजार घरांची संगणकीय सोडत, दोन लाख घरे बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:33 AM2019-11-27T01:33:51+5:302019-11-27T01:58:44+5:30
स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील शिल्लक ८१० आणि नव्याने उभारलेल्या गृहप्रकल्पातील नऊ हजार २४९ अशा सिडकोच्या दहा हजार घरांसाठी मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात आली.
नवी मुंबई : स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील शिल्लक ८१० आणि नव्याने उभारलेल्या गृहप्रकल्पातील नऊ हजार २४९ अशा सिडकोच्या दहा हजार घरांसाठी मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. नेरुळ येथील आगरी कोळी भवनमध्ये पार पडलेल्या या सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे घरांसाठी अर्ज केलेल्या सुमारे एक लाख अर्जदारांना घरी बसून सोडत पाहता आली.
सिडकोने आगामी काळात विविध आर्थिक घटकांसाठी जवळपास दोन लाख घरे बांधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यापैकी ९५ हजार घरांच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील नऊ हजार २४९ घरांच्या विक्रीसाठी सप्टेंबर २०१९ मध्ये आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्याचबरोबर स्वप्नपूर्ती या जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक ८१० घरांसाठीही अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या दोन्ही गृहप्रकल्पातील दहा हजार घरांसाठी जवळपास एक लाख अर्ज सिडकोला प्राप्त झाले होते. त्याची संगणकीय सोडत मंगळवारी काढण्यात आली. या वेळी माजी सनदी अधिकारी सुरेशकुमार, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे उपमहासंचालक मोईज हुसैन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली. सोडत पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या पणन विभागाने विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, या सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. सिडकोने गेल्या वर्षी १५ हजार घरांची सोडत काढली होती. या योजनेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. राज्यभरातून जवळपास पावणेदोन लाख अर्ज दाखल झाले होते. या योजनेतील यशस्वी अर्जदारांना टप्प्याटप्प्याने घरांचे वाटपपत्रे दिले जात आहे. मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांनाही अशाच प्रकारे सदनिकांचे वाटप केले जाणार आहे.
सिडकोच्या नवीन गृहप्रकल्पातील ९,२४९ घरांपैकी ३,१७६ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर ६,०७३ घरे अल्प उत्पन गटासाठी आहेत. स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या ८१० घरांपैकी ११५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल तर ६१५ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.