‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ संकल्पना राज्यात राबविणार; आरोग्य सुविधांचे ऑनलाइन लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 01:09 AM2020-09-11T01:09:01+5:302020-09-11T06:33:21+5:30
सर्वांची मदत घेऊन ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राज्यभर राबवायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नवी मुंबई : राज्यातील शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने पुढील काळात राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात निर्माण केलेल्या विविध आरोग्य सुविधांचे १० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तुर्भे येथील राधा स्वामी सत्संग कोव्हिड सेंटरचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले उपस्थित होते. यावेळी अत्याधुनिक आर.टी.पी.सी.आर. चाचणी आणि प्रयोगशाळा, डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयातील २०० आयसीयू बेड्ससह ८० व्हेंटिलेटर बेड्सची सुविधा आणि एमजीएम रुग्णालय सेक्टर ३०, सानपाडा येथे १००३ बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि पाटीदार समाज भवन ऐरोली येथील ३०२ बेड्सच्या कोविड केअर सेंटरचे देखील लोकार्पण करण्यात आले. कोरोना काळात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. त्या सर्वांची मदत घेऊन ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राज्यभर राबवायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.