निसर्गप्रेमींनी राबवली बीजबॉक्स संकल्पना; शहरात लावले पाच हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:27 AM2019-06-02T00:27:01+5:302019-06-02T00:27:16+5:30

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात.

Concept of Seed Seeds implemented by nature lovers; Five thousand trees planted in the city | निसर्गप्रेमींनी राबवली बीजबॉक्स संकल्पना; शहरात लावले पाच हजार वृक्ष

निसर्गप्रेमींनी राबवली बीजबॉक्स संकल्पना; शहरात लावले पाच हजार वृक्ष

googlenewsNext

नवी मुंबई : निसर्गमित्र मंडळ नेरुळने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड व संवर्धन मोहीम सुरू केली आहे. पामबीचच्या जोडरस्त्यावर बीजबॉक्सची संकल्पना राबविण्यात आली आहे. येथून उपलब्ध झालेल्या फळांच्या बियांपासून रोपे तयार केली जात असून, ती शहरात विविध ठिकाणी लावण्यात येत आहेत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात. प्रसारमाध्यमांकडे छायाचित्रे पाठवून प्रसिद्धी मिळविण्याचाही प्रयत्न केला जातो; परंतु शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता वर्षोनुवर्षे वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहेत. यामध्ये नेरुळमधील निसर्गमित्र मंडळाचाही समावेश आहे. पर्यावरणप्रेमी शेषराव गर्जे हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक वर्षांपासून मुंबई व नवी मुंबईमध्ये वृक्षलावगड करण्याचे काम करत आहेत. सद्यस्थितीमध्ये शासकीय यंत्रणेकडून विदेशी झाडे लावली जातात. या झाडांना फळे येत नसल्यामुळे पक्ष्यांना त्याचा फारसा लाभ होत नाही, यामुळे गर्जे व त्यांचे सहकारी आंबा, फणस, चिंच, लिंबू, रवि, कडुलिंब व इतर वृक्षलागवडीला पसंती देत आहेत. आतापर्यंत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त वृक्ष विविध ठिकाणी लावले आहेत. वृक्षलावगड केल्यानंतर ते किमान पाच ते सहा फूट उंच होईपर्यंत त्यांची निगा राखली जाते.

निसर्गमित्र मंडळ उन्हाळ्यामध्ये बीजबॉक्सची संकल्पना राबवते. पामबीच रोडवर नेरुळमध्ये पदपथाला लागून बॉक्स ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आंबे, जांभूळ व इतर फळे खाल्यानंतर त्यांच्या बिया या बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकडून संकलित झालेल्या बियांपासून रोपे तयार करण्यात येतात. ही रोपे पावसाळ्यात पामबीच रोड, रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड व इतर ठिकाणी लागवड केली जाते. पामबीच रोडला लागून चार वर्षांमध्ये १५०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांची काळजी घेण्यासाठी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून झाडांना खत, पाणी देण्याचे काम केले जात आहे. यासाठी एल. डी. मोदी हे पर्यावरणप्रेमीही मदत करत असून त्यांनी या कामासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी आम्ही वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहोत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. बीजबॉक्सच्या माध्यमातून फळांच्या बिया संकलित केल्या जात असून त्यापासून रोपे तयार केली जातात. यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - शेषराव गर्जे, पर्यावरणप्रेमी

Web Title: Concept of Seed Seeds implemented by nature lovers; Five thousand trees planted in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.