सीवूड स्टेशनसमोरील वृक्षांवर संक्रांत
By admin | Published: November 11, 2016 03:33 AM2016-11-11T03:33:41+5:302016-11-11T03:33:41+5:30
सीवूड रेल्वे स्टेशनच्या भूखंडावर एल अॅण्ड टीने उभारलेल्या टोलेजंग इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी पालिका प्रशासनाचीही धडपड सुरू आहे
नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशनच्या भूखंडावर एल अॅण्ड टीने उभारलेल्या टोलेजंग इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी पालिका प्रशासनाचीही धडपड सुरू आहे. इमारतीचा भव्यपणा दिसावा यासाठी समोरील ३७ वृक्ष तोडण्याची परवानगी महापालिकेने दिल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी शुक्रवारपासून ‘चिपको आंदोलन’ सुरू केले जाणार आहे.
हार्बर मार्गावरील सर्वात भव्य रेल्वे स्टेशन म्हणून भविष्यात सीवूड ओळखले जाणार आहे. एल अॅण्ड टीला स्टेशन विकसित करण्याचा ठेका देण्यात आला आहे. कंपनीने सर्वप्रथम रेल्वे स्टेशन विकसित करून तेथे अत्याधुनिक सुविधा देणे अपेक्षित होते; पण कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात स्टेशनची उभारणी केली असली तरी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फक्त एका बाजूलाच मार्गिका ठेवण्यात आली आहे. अपंग, ज्येष्ठ नागरिक व इतर सर्वच नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना अपुऱ्या सुविधा दिल्या जात असताना दुसरीकडे व्यावसायिक इमारतीमधील दुकाने व कार्यालये सुरू करण्यासाठी इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेनेही आवश्यक त्या परवानग्या देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आम्ही ९०० वृक्ष लावले असल्याचे लेखी दिल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र लवकरच दिले जाणार आहे, पण प्रत्यक्षात या वृक्षांची पाहणी करण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेने येथील पदपथाच्या बाजूला १५ वर्षांपूर्वी वृक्ष लागवड केली आहे. पेल्टोफोरम नावाचे वृक्ष १५ ते १६ फूट उंच झाले आहेत. यामधील ३७ वृक्ष तोडण्याची परवानगी कंपनीने मागितली असून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने तत्काळ परवानगी दिली आहे. यासाठी सूचना व हरकतीची नोटीस स्थानिक दैनिकामध्ये दिली होती, पण जे दैनिक सीवूड परिसरातील नागरिकांच्या वाचनामध्ये येणार नाही याची दक्षता घेऊन नोटीस दिली होती. दोन दिवसांपासून वृक्षतोड व छाटणी सुरू झाली याविरोधात आंदोलन छेडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)