नेरळ : माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग १०९ वरील नेरळ-कळंब रस्त्याच्या दुरवस्थेविरुद्ध ११ नोव्हेंबरपासून उपोषण करण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी घेतला होता. २०१८मध्ये मंजूर असलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण केले नसल्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या व प्रत्यक्ष कामास सुरुवातही केली. त्याचप्रमाणे यासंदर्भात त्यांना लेखी पत्र दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्ता कळंब पोही येथे कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. त्या रस्त्याचे डांबरीकरण आणि ३५० मीटर भागात सिमेंट काँक्रिटीकरण हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले होते. डिसेंबर २०१८मध्ये या कामाचे कार्यादेश अलिबाग येथील मे. सिद्धिविनायक कंपनीला देण्यात आले होते. निर्धारित मुदतीत ठेकेदाराने रस्त्याचे काम पूर्ण केले मात्र सिमेंटचा रस्ता बनविला नाही.
मध्य रेल्वेच्या नेरळ पाडा फाटकपासून साई मंदिर हा ३५० मीटर लांबीचा रस्ता काँक्रिटचा बनविला जाणार होता. साडेपाच मीटर लांबीचा रस्ता सिमेंटचा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यादेश दिले होते. मात्र, आजतागायत या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम मे. सिद्धिविनायक कंपनीकडून करण्यात आले नाही. त्यामुळे या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री यांना सरकारी पोर्टलवरून केली होती. जुलै २०२०मध्ये तशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी केली होती आणि त्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत कोणताही खुलासा केला नव्हता.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रदीप माळी यांनी साईमंदिर येथे येऊन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांचे पत्र दिले व रस्त्याचे काम सुरू झाले असल्याने आपण आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती विजय हजारे यांना केली. या वेळी राष्ट्रवादीचे कोल्हारेचे अध्यक्ष संजय मोरे, युवासेनेचे रवी पेरणे, सुनील राणे, शिवसेनेचे शाखाप्रमुख नामदेव गोमारे, बरकत अली बाजी, लक्ष्मण चंचे, नरेंद्र तुपे आदी उपस्थित होते.