स्टील मार्केटमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:43 AM2018-10-28T04:43:37+5:302018-10-28T04:43:59+5:30
उर्वरित कामांकरिता निविदा प्रसिद्ध; वर्षभरात होणार मार्केटचा कायापालट
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत स्टील मार्केटचे स्वरूप बदलण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश लोखंड-पोलाद बाजार समितीने केला आहे. पेरी फेरी रोडचे काँक्रीटीकरण झाले आहेच. त्याचबरोबर इतर तीन अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्याकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. वर्षभरात या मार्केटचा पूर्ण कायापालट होईल, असा विश्वास बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर विकसित करण्याबरोबरच शासनाने लोखंड-पोलाद बाजारपेठ वसविण्याची जबाबदारी सिडकोकडे सोपवली; पण सिडकोकडून या ठिकाणी मूलभूत सोयी-सुविधाही पुरवण्यात आल्या नाहीत. मार्केटमधील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. समितीचे चेअरमन गुलाबराव जगताप यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून १०० कोटी रुपयांचा सहा कि.मी. अंतराचा मुख्य रस्ता तयार करून घेतला. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजार समितीच्या आवारात २० व १५ मीटर रुंदीचे १३ कि.मी. अंतराचे रस्ते आहेत. त्यांची अवस्था बिकट झाली होती, त्यापैकी बाजार समितीने तीन कि.मी. अंतराचे रस्त्यांचे सिमेंटीकरण केले आहे. याकरिता २१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बाजार समितीकडे निधीचा तुटवडा असल्याने चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास रसाळ यांनी सिडको आणि एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांच्याकडून निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी अंतर्गत नियोजन करून हे काम केले. त्याचबरोबर पावणेतीन कि.मी. अंतराच्या रस्त्यांकरिता २० कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच प्रक्रि या पूर्ण करून काम सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित रस्त्यांकरिता ५० कोटी रुपयांची गरज आहे. त्याकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सिडकोने रस्ते कधी केलेच नाहीत, त्यामुळे अंतर्गत परिस्थिती बिकट झाली. बाजार समितीने काही रस्ते तयार केले. त्याचबरोबर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. एक वर्षाचा कालावधी असला तरी काम जलद व्हावे, यासाठी चार ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहेत.
- विकास रसाळ,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
स्टील मार्केट कमिटी