ठाणे-बेलापूर रोडवरील अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरण मार्गी
By admin | Published: July 9, 2016 03:37 AM2016-07-09T03:37:04+5:302016-07-09T03:37:04+5:30
दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम
नवी मुंबई : दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. दोन मार्गिका वाहतुकीसाठी तत्काळ खुल्या करण्यात आल्या असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे.
सायन - पनवेल महामार्गानंतर नवी मुंबईमध्ये सर्वाधिक वाहतूक ठाणे- बेलापूर रोडवरून होते. ठाणे व मनपा क्षेत्रातील औद्योगिक वसाहती व जवळील जेएनपीटी बंदर यामुळे या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रोडवर प्रत्येक वर्षी खड्डे पडत असल्याने पालिकेने या रोडचे काँक्रीटीकरण केले आहे. तुर्भे एस. के. व्हील ते ठाणे मनपाच्या हद्दीपर्यंत रोडचे रूंदीकरण केले. परंतु दिघा गावाजवळ रोडवर असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे तब्बल आठ वर्षे रूंदीकरणाचे काम रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिघा विभाग कार्यालयाचा पाहणी दौरा करताना त्यांच्या हा प्रश्न निदर्शनास आला. अतिक्रमण आठ दिवसांमध्ये हटविण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला. या भूमिकेमुळे बांधकामधारकांनी स्वत:च अतिक्रमण जमीनदोस्त केले. ८ वर्षांपासून रखडलेला प्रश्न चक्क ८ दिवसांमध्ये सुटला. अतिक्रमण हटविल्यानंतर तत्काळ रूंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. युद्धपातळीवर काम करून या मार्गावरील दोन लेन ३ जुलैला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. उर्वरित लेनचे कामही प्रगतिपथावर आहे.
आयुक्तांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे व टाईम बाँडमध्ये कामे करण्याच्या धोरणामुळे वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न तत्काळ मार्गी लागला आहे. येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. अपघात होवून अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. आता या सर्व समस्या सुटणार आहेत. येथील वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहतूकदार ऐरोली - मुलुंड मार्गाचा अवलंब करत होते. यामुळे ७ ते ८ किलोमीटरचा प्रवास वाढत होता. याशिवाय टोलसाठी ६० ते ७० रूपये खर्च होत होता. आता हा खर्च वाचणार असल्याने वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. शहरवासीयांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)