चार वर्षांपासून अधिकारी नसल्याने जनावरांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:31 AM2021-05-02T00:31:52+5:302021-05-02T00:32:20+5:30
तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयात सुविधांची वानवा
तळा : तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयात गेल्या चार वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा व अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय असला तरी सध्या त्याची स्थिती बिकट आहे. तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या हद्दीत ४२ गावे येत असून तालुक्यात मोठ्या संख्येने पशुधन असताना त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा नाही. शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे व शेती हिताच्या दृष्टीकोनातून इतर पशुधन आहे. मात्र तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयात गेल्या चार वर्षांपासून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये पशुधन विकास अधिकारी व व्रणोपचार यांचा समावेश आहे. यामुळे याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारावर होत आहे.
तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयाची अवस्थादेखील बिकट झाली असून, स्वतःची हक्काची जागा नाही. तसेच पशुवैद्यकीय चिकित्सालयाची कित्येक वर्षांपासून दुरुस्तीदेखील केलेली नाही. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये पशुधन पर्यवेक्षकांकडून जनावरांवर उपचार केले जातात; परंतु शस्त्रक्रियांसारख्या बाबींसाठी शेतकरी आपली जनावरे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात आणतात. या चिकित्सालयाशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. परंतु, या ठिकाणी असलेली विविध रिक्त पदे, औषधांचा तुटवडा अशा अनेक बाबींमुळे या ठिकाणी अपेक्षित असे उपचार पशूंना मिळत नाहीत. येथील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी इतर तालुक्यांतील डॉक्टरांना बोलवावे लागत आहे. यामुळे जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आम्हा शेतकऱ्यांना तालुक्याबाहेरील डॉक्टरांना बोलावून जनावरांवर उपचार करावे लागतात. यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी आमची मागणी आहे.
- भास्कर गोळे, उपजिल्हाध्यक्ष,
बळीराजा शेतकरी संघटना