गोठीवलीत तलावाची दुरवस्था; घणसोलीत विहिरींवर चढले शेवाळ, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:32 AM2020-10-15T07:32:06+5:302020-10-15T07:32:16+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष, तलावाच्या सभोवताली केरकचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच तसेच लहान-मोठी झाडे वाढलेली आहेत
नवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तलाव आणि विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे घणसोली ‘एफ’ विभागातील विहिरी आणि तलावांची पार दुरवस्था झाल्याने त्यातील दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यात गोठीवली गावातील खदान तलाव आणि घणसोली गावातील विहिरींचा समावेश आहे.
गोठीवली गावाला लागूनच खदान तलाव आहे. ता तलावाचे ‘स्वर्गीय राजीव गांधी तलाव’ असे लॉकडाऊनपूर्वी महापालिकेने नामकरण केले आहे. १ मार्च २०२० रोजी महापालिकेच्या वतीने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र आज या तलावाची दुरवस्था झाली आहे. वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्यामुळे तलावाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. गवत चार ते पाच फूट वाढलेले आहे. संरक्षण भिंतीचा आणि लोखंडी ग्रीलचा वापर झोपडपट्टी परिसरातील शेकडो रहिवाशांकडून कपडे सुकविण्यासाठी केला जात आहे. जलप्रदूषित दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेकदा मासळी मरण्याच्या अनेक घटना घडत आहेत.
तलावाच्या सभोवताली केरकचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच तसेच लहान-मोठी झाडे वाढलेली आहेत. वाढलेल्या गवतामुळे सापांचा सुळसुळाट असल्याने सकाळ-सायंकाळी वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता टाळता येत नाही.