सुनेची मनधरणी करण्यासाठी आलेल्या सासूचे हाल; लॉकडाउनमुळे कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:52 AM2020-04-27T04:52:13+5:302020-04-27T04:52:24+5:30
दीड महिन्यापासून त्या नेरुळ गावदेवी परिसरात उघड्यावर राहत आहेत. सुनेने घरातून हाकलून दिले, त्याच दिवशी लॉकडाउन लागू झाल्याने त्या अडकून पडल्या आहेत.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : रुसून आलेल्या सुनेची मनधरणी करण्यासाठी आलेल्या सासूवर कचऱ्यातील अन्न शोधून खायची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून त्या नेरुळ गावदेवी परिसरात उघड्यावर राहत आहेत. सुनेने घरातून हाकलून दिले, त्याच दिवशी लॉकडाउन लागू झाल्याने त्या अडकून पडल्या आहेत.
तुळसाबाई ज्ञानोबा व्हावळे, असे या महिलेचे नाव असून त्या मूळच्या परळी येथील माळहिवरा गावात राहतात. त्यांना दोन मुले असून दोघांचीही लग्न झाली आहेत. रंगपंचमीच्या काही दिवसआधी मोठ्या मुलाचे बायकोसोबत भांडण झाल्याने त्यांची सून माहेरी नेरुळ येथे निघून आली. बरेच दिवस होऊनही सून परत न आल्याने तुळसाबाई सुनेची मनधरणी करण्यासाठी नेरुळला आल्या. दिवसभर सुनेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनेने भांडण करून त्यांना हाकलून दिले. ती रात्र रस्त्यावर काढून सकाळी गावी जाण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाउन घोषित झाला आणि त्या अडकल्या. सुरुवातीला मिळेल त्या मार्गाने गावी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या वेळी एका महिलेने त्यांची समजूत काढून थांबवले. सलग तीनदा लॉकडाउन वाढल्याने सोबत असलेले पैसेही खर्च झाले. त्यामुळे कचराकुंडीतून अन्न गोळा करून भूक भागविण्याची वेळ त्यांच्यावर आली.
नेरुळ सेक्टर १० येथे राहणाºया कमल शेरे या महिलेने त्यांना कचराकुंडीतून अन्न जमा करताना पाहिले. त्यांनी तुळसाबाईकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली. मात्र, तरीही त्यांच्या गावाकडची ओढ लागून आहे.
>लॉकडाउन लागल्यानंतर काहींनी झोपडपट्टीत अन्न वाटताना त्यांनाही दिले. मात्र, काही दिवसांनंतर ते मिळेनासे झाले. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी परिसरातली रद्दी जमा करून विकून पैसे मिळ्वण्याचाही प्रयत्न केला; परंतु जमा केलेली रद्दी विकण्याचीही सोय नसल्याने त्याच ठिकाणी उघड्यावर त्या दिवस घालवत आहेत.
लॉकडाउनमुळे अनेकांवर अनपेक्षितपणे घरापासून दूर राहण्याची वेळ आली आहे; परंतु या संकटातही तुळसाबाई यांनी हार मानली नाही. झोपडपट्टीच्या बाजूलाच मोकळ्या जागेतच त्या रात्रीचा आसरा घेत आहेत. तर दिवसभर परिसरात फिरून कोणाकडून कसलेही मजुरी काम मिळतेय का, याची चौकशी करत फिरत आहेत.